स्पर्धा परीक्षा एक आजार ; म्हणतायेत फर्ग्युसनचे विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 02:35 PM2019-07-15T14:35:11+5:302019-07-15T14:36:37+5:30
महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पथनाट्यातून स्पर्धा परीक्षांबाबत जागृती करण्यात येत आहे.
पुणे : स्पर्धा परीक्षा एक आजार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याआधी इतर करिअर ऑप्शन्सकडे सुद्धा लक्ष द्या असे आवाहन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी करत आहेत. महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. स्पर्धा परीक्षा एक आजार असे या पथनाट्याचे नाव असून त्या द्यावारे स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.
पुण्यात शिक्षणासाठी राज्यातून तसेच देशभरातून विद्यार्थी येत असतात. पुण्यातील दर्जेदार शिक्षण आणि इतर साेविसुविधा यांमुळे पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असताे. त्यातच राज्याच्या विविध भागांमधून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची माेठी क्रेझ असल्याने त्याकडेच त्यांचा अधिक ओढा असताे. आपल्या मुलाला अधिकारी म्हणून पाहण्याची पालकांची इच्छा असल्याने पालक देखील पदरमाेड करुन पाल्याला पुण्यात शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पाठवत असतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेस तसेच वाचन कक्षांची संख्या देखील पुण्यात जास्त आहे. अनेकदा क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट देखील हाेत असते. सरकारी नाेकरीच्या जागा काही शे मध्ये असतात. परंतु त्यासाठी तयारी करणाऱ्यांची संख्या लाखाेंच्या घरात आहे. एकानंतर एक असे अनेक प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केले जात असल्याने इतर नाेकऱ्यांसाठीचे त्यांचे वय देखील निघून जाते. अनेकदा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे डिग्रीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत देखील जागृती करण्याचे काम पथनाट्यातून करण्यात आले.
पथनाट्य सादर करणारा सुनिल जाधव म्हणाला, नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांबाबत आम्ही पथनाट्यातून प्रबाेधन करत आहाेत. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी अनेकदा केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करायची याचा विचार करुन प्रवेश घेत असतात. त्यामुळे त्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करत असताना पथनाट्यातून प्रबाेधन देखील आम्ही करत आहाेत. आम्हाला याद्वारे विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की 14 विद्या आणि 64 कला असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे या विद्यांकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
निवेदिता साळवे म्हणाली, ग्रामीण भागातून येणारे अनेक विद्यार्थी हे येथे येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. ग्रामीण भागातले पालक आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रसंगी आपली जमीन देखील विकतात. परंतु अनेक प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांना यश येत नाही. त्यामुळे पथनाट्यातून आम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की इतर करिअरच्या देखील वाटा आहेत. त्याकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.