रस्ते घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांविरोधात तक्रार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:11+5:302021-01-21T04:12:11+5:30
पुणे : पशु-पक्षी विशेषत: कुत्री पाळताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आरोग्य परवाना दिला जातो. यावेळी कुत्र्यांना नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर ...
पुणे : पशु-पक्षी विशेषत: कुत्री पाळताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आरोग्य परवाना दिला जातो. यावेळी कुत्र्यांना नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर आणू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत़ तरीही कोणी मालक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर, सार्वजिनक ठिकाणी, उद्यानांमध्ये, सोसायटी आवारात नैसर्गिक विधीसाठी आणल्याचे कोणाला आढळल्यास संबंधितांविरोधात क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तक्रार करावी़ त्यांच्या विरोधात कारवाई निश्चित केली जाईल, असे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मुक्या कुत्र्यांना रस्त्यांवर, पदपथांवर नैसर्गिक विधीसाठी आणणाऱ्या मालकांची छायाचित्रे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर शहराच्या विविध भागातून या संबंधी प्रतिक्रिया आल्या. आमच्या भागात सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या पाळीव कुत्र्यांचे अनेक मालक असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रमुख डॉ. भारती यांनी सांगितले, “संबंधित कुत्रा मालकांविरोधात नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रार करावी़ त्यांच्यावर प्रारंभी दंडात्मक कारवाई केली जाईल़ ही कारवाई रकमेत वाढ करून तीन टप्प्यांत राहील़ पण या कारवाईनंतरही हे प्रकार थांबले नाही तर त्यांचा पाळीव प्राण्यांचा परवाना रद्द केला जाईल़ ज्यांच्याकडे परवानाच नाही अशांवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी तसेच घनकचरा विभागातील निरीक्षकांना देणार आहे.”