हप्ते वसूल करणाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार करा
By Admin | Published: January 11, 2016 01:30 AM2016-01-11T01:30:22+5:302016-01-11T01:30:22+5:30
दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी
पिंपरी : दादागिरी, गुंडगिरी करून उद्योजकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि त्यांच्याकडून जबरदस्ती हप्ते वसूल करणाऱ्या माथाडी कामगार संघटना आणि माथाडी टोळ्यांच्या विरोधात पोलिसांकडे नावासह तक्रार करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनने उद्योजक व लघुउद्योजकांना केले आहे.
माथाडी कामगार संघटनांची दादागिरी व गुंडगिरी आणि या ब्लॅकमेलिंगला वैतागलेले उद्योजक यावर प्रकाश टाकणाऱ्या बातम्या ‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे लोकमतचे अनेकांनी अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. सरकार, मंत्री, एमआयडीसी प्रशासन आणि पोलीस निष्क्रिय असल्याने माथाडीची गुंडगिरी आणि दादागिरी संपत नसल्याची खंत उद्योजक आणि लघुउद्योजकांनी व्यक्त केली.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष इरफान सय्यद यांनी लोकमतकडे निवेदन देऊन सदर मागणी केली आहे. उद्योगात अनेक कंपन्या माथाडी कायद्याचा वापर न करता अनधिकृत माथाडी संघटनांना रक्कम देऊन एकप्रकारे प्रोत्साहन देतात, असे त्यांनी म्हटले आहे. कायद्यानुसार काम करणाऱ्या अनेक संघटना मुंबई, पुणे व पिंपरी -चिंचवड परिसरातील अनेक छोट्या- मोठ्या कंपन्यांत कार्यरत आहेत. आतापर्यंत मान्यताप्राप्त माथाडी संघटनांच्या विरोधात गुंडगिरीसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनेक उद्योजक व लघुउद्योजकांना माथाडी कायद्याबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यामुळे हे उद्योजक उद्योगाच्या सुरक्षेसाठी बोगस संघटनांना हप्ते देऊन मोकळे होतात. अशा संघटनांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना वाव देण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुुसरीकडे काही उद्योग संघटनेचे नेते माथाडी संघटनेकडून होणारा जाच थांबविण्याची मागणी प्रशासन व वृत्तपत्राकडे करतात. अलीकडे बांधकाम व्यावसायिक, छोटे उद्योग या ठिकाणी अनेक माथाडीच्या फिरत्या टोळ्या दमदाटी करीत रक्कम वसुलीचे काम करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)