चोरीचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर,पोलिसांनी मुंबईतून तिघांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:22 PM2018-03-30T16:22:02+5:302018-03-30T16:22:02+5:30
बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव आरोपीने केला. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली.पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले.
पिंपरी : मुंबईतील जव्हेरी बाजारातून आणलेली पुण्यातील सराफी व्यावसायिकाची सव्वा कोटीची सोन्याची बिस्किटे अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पळविली असा बनाव करणारा पुण्यातील सराफी व्यावसायिकाकडे काम करणारा डिलिव्हरी बॉयने चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १ कोटी ३५ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज त्याने पळविला असल्याचे उघडकीस आले आहे. हिंजवडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून तिघांना मुंबईतून अटक केली आहे. पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून आरोपीचे मित्र आणि नातेवाईकांकडून चार किलो ९०० ग्रॅम सोने जप्त केले. या प्रकरणी फिर्यादी आणि आरोपी डिलिव्हरी बॉय बेहराराम शांताराम पुरोहित (वय ३१,रा. टिंबर मार्केट, पुणे, मूळ रा. सिल्दर, जि. सिरोही, राजस्थान) याच्यासह तिघांना अटक केली आहे. बेहराराम पुरोहित पुण्याच्या रविवार पेठेतील समृद्धी ज्वेलर्स दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मालक अरविंद सरेमल चोप्रा यांच्या सांगण्यावरून पुरोहित मुंबई मधील जव्हेरी बाजारातून अरिहंत ज्वेलर्स आणि नम्रता ज्वेलर्स या दुकानांमधून १०० ग्रॅम वजनाची २५ बिस्किटे घेऊन पुण्याकडे निघाला. मात्र, त्याने सोन्याची बिस्किटे पुण्याकडे न आणता मुंबईतच नातेवाईक व मित्रांकडे ठेवली. पुण्यात बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव त्याने केला. तशी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटना घडल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी त्याला झालेला विलंब लक्षात घेऊन पोलिसांना त्याचा संशय आला होता. माहिती योग्य प्रकारे देत नसल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यानेच सोने मुंबई येथे आपल्या मित्र व नातेवाईकांकडे लपवून ठेवले असल्याचे कबूल केले. युनिट एकचे एक पथक तातडीने मुंबईकडे रवाना झाले. या पथकाने मुंबईमध्ये राहणाऱ्या पुरोहितच्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा शोध घेऊन लपवून ठेवलेले ४ किलो ९०० ग्रॅम सोने जप्त केले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांच्या पथकाने केली.