गैरपध्दतीने काढण्यात आलेल्या निविदांची तक्रार करणार : प्रशांत जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:24+5:302021-05-19T04:12:24+5:30
पुणे : महापालिकेच्या इमारतींच्या सुरक्षिततेकरिता कंत्राटी पध्दतीने सुरक्षारक्षक घेण्याकरिता काढण्यात आलेली निविदा, ही भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीलाच ...
पुणे : महापालिकेच्या इमारतींच्या सुरक्षिततेकरिता कंत्राटी पध्दतीने सुरक्षारक्षक घेण्याकरिता काढण्यात आलेली निविदा, ही भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीलाच मिळावी या पध्दतीने काढण्यात आली आहे़, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. या प्रकरणी आपण राज्य सरकारकडे तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
याबाबत पत्रकार परिषदेत जगताप यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी हे पार्किंग टेंडरसह, सुरक्षारक्षक व सफाई कर्मचारी यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करताना आपल्या मर्जीतील ठेकेदारांना ते काम मिळावे यादृष्टीनेच निविदेची रचना करीत आहेत़ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याबाबतचे निवेदन देण्यात आले़ यावर आयुक्तांनी यात स्वत: लक्ष घालून चुकीचे प्रकार झाले असतील, तर त्यात सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे़
दरम्यान महापालिकेच्या सुरक्षारक्षकांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करताना, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे निकष लावणे कितपत योग्य आहे़ असे प्रकार इतर महापालिकेमध्ये घडतात का असा प्रश्न उपस्थित करीत, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष एकतर्फी निविदा प्रक्रिया राबवून मर्जीतल्यांनाच कंत्राटी कामगार भरतीची कामे कशी मिळतील यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत असल्याचा आरोपही जगताप यांनी यावेळी केला़
--------------------------