राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम निकृष्ट, खासदार आढळराव यांच्याकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:10 AM2018-12-29T00:10:42+5:302018-12-29T00:10:51+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथे रस्तारुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने हे काम नारायणगाव ग्रामस्थांनी बंद पाडून त्याची तक्रार थेट खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे काल (दि. २७) केली. या रस्त्याचे काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नारायणगाव : राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथे रस्तारुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने हे काम नारायणगाव ग्रामस्थांनी बंद पाडून त्याची तक्रार थेट खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे काल (दि. २७) केली. या रस्त्याचे काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नारायणगावचे बाह्यवळणाचे काम रेंगाळत असल्याने खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रयत्नातून नारायणगाव आणि वारुळवाडी येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. ठेकेदाराने वारूळवाडी ते नारायणगाव एसटी बस स्थानकासमोरील रस्त्याचे काम निकृष्ट सुरू केले. नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांना हे काम निकृष्ट आढळल्याने २ तास काम बंद ठेवले होते.
याबाबत सरपंच पाटे यांनी खासदार आढळराव-पाटील यांच्याकडे तक्रार केली. खासदार आढळराव यांनी काल (दि. २७) नारायणगाव येथे तातडीची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक कार्यालयातील डेप्युटी जनरल मॅनेजर झोडगे, टीम लीडर सी. डी. फकीर, असिस्टंट हायवे इंजिनिअर डी. के. शिंदे, जि. प. आशाताई बुचके, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच योगेश बाबू पाटे, संतोषनाना खैरे, रोडवे सोल्युशन इंडिया प्रा.लि. पुणे कंपनीचे ठेकेदार संतोष घोलप आदी उपस्थित होते.
या बैठकीत सरपंच पाटे यांनी, ग्रामस्थांनी रस्त्याच्या असलेल्या कामाचा दर्जा, मुरुमाऐवजी मातीचा वापर, रस्तारुंदी करताना तो तांत्रिक पद्धतीने व चांगल्या दर्जाने तयार केला जात नाही, अशी तक्रार केली. केलेल्या डांबरीकरण एकाच दिवसात उखडण्यास सुरुवात झाली आहे. हे निदर्शनास आणून दिले. सरपंच पाटे यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने काम चुकीच्या व निकृष्ट दर्जाचे असून तांत्रिक बाबी पूर्ण करून होत नसल्याबाबत व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची तक्रार खासदार आढळराव यांच्याकडे केली आहे.
वर्षभरापासून खेड ते नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम बंद असल्याने खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विशेष प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खेड ते नारायणगाव येथील अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील ९.१४ किलोमीटर रुंदीकरण रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.
खेड व नारायणगाव येथील सध्याचा राष्ट्रीय महामार्ग रस्ता वारुळवाडी येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील बाह्यवळण ते नारायणगाव शेवंताई इंडेन गॅस एजन्सीसमोरील बाह्यवळण असलेला ५.३७३ किलोमीटर रास्ता रुंदीकरण काम सुरू असून ते काम पुणे येथील रोडवे सोल्युशन इंडिया प्रा. या खासगी कंपनीने घेतलेले आहे. पहिले या रस्त्याचे टेंडर ३८ कोटींचे होते, ते आता ३० कोटींच्या टेंडरमध्ये होत आहे. सध्याचा राष्ट्रीय महामार्ग रस्ता हा ७ मीटर असून तो १० मीटर होणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा १.५० मीटर साईड खडीकरण रास्ता (जीएसबी) व त्यानंतर वारुळवाडी हद्दीतील नारायणगाव पोलीस ठाणे ते पूनम हॉटेल १.५० मीटर बंदिस्त गटारलाईन व त्यापुढील उर्वरित ठिकाणी ओपन गटारलाईन होणार आहे, अशी माहिती असिस्टंट हायवे इंजिनिअर डी. के. शिंदे यांनी बैठकीत दिली आहे. रोडवे सोल्युशन या कंपनीने सुरू केलेले रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी खासदार आढळराव व सरपंच योगेश पाटे यांच्याकडे तक्रार केली आहे.
वारुळवाडी हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा मुख्य डांबरी रस्ता सोडून काही ठिकाणी १ ते २ फूट साईडपट्टी खोदून त्यावर खडी टाकून रोलिंग केले जात आहे व त्यात मुरूम न टाकता मातीमिश्रित मुरूम टाकून रस्ता तयार केला जात आहे. तेथील सुपरवायझर व कामगारांना रस्ता नीट करण्याच्या सूचना ग्रामस्थांनी केल्या, तरीही ठेकेदाराने ते काम सुरूच ठेवले. हॉटेल निलायमसमोर केलेले डांबरीकरण दोन दिवसांत उखडून रस्त्यात खड्डे पडू लागले. रस्त्यावर दुतर्फा ३ फूट डांबर टाकलेच नाही.
संबंधित ठेकेदाराने सुरू केलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. खासदार आढळराव-पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर झोडगे, ठेकेदार यांची कानउघाडणी करून रस्ता चांगल्या दर्जाचा करण्याचा सूचना केल्या आहेत.