जलवाहिनी फोडल्याप्रकरणी १९ शेतकऱ्यांविरुद्ध तक्रार
By admin | Published: April 24, 2016 04:21 AM2016-04-24T04:21:29+5:302016-04-24T04:21:29+5:30
उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत
भिगवण : उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा धोक्यात येत आली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची तक्रार यांत्रिकी उपविभागाचे उपअभियंता एस. व्ही. नखाते यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कुंभारगाव ते बारामती अशी जलवाहिनी २५ वर्षांपूवी करण्यात आली आहे. बराच कालावधी उलटल्याने ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी या जलवाहिनीमधून पाणीगळती होत आहे. त्यातच उजनीतील पाणीसाठा कमी झाल्याने जलवाहिनीचे पाणी बारामती उद्योगाला कमी पडत आहे. त्यामुळे महामंडळ अधिकारी यांचे लक्ष गळतीकडे गेले आहे.
भिगवण पोलिसांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेत शेतकऱ्यांना बोलावून समजावून सांगत गुन्हे दाखल करण्याची घाई केली नसल्याचे समजते. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी शेतकरी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तर गुन्हे दाखल झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचे यातील शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत नखाते यांनी मदनवाडी, बंडगरवाडी येथील सुमारे १९ शेतकऱ्यांच्या नावे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यामध्ये हे शेतकरी या जलवाहिनीतून पाणी चोरत असल्याचा आरोप केलेला आहे. यासाठी महामंडळाने काही दिवसांपूर्वी या जलवाहिनीच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त घेतला होता. त्यासाठी दोन लाखांची रक्कमही अदा केली आहे. त्यामुळे महामंडळ आणि शेतकरी यांचा वाद पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.