भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:12 PM2018-04-09T17:12:54+5:302018-04-09T17:12:54+5:30

पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे.

complaint against Bhama Askhed 100 affected farmers, in connection with problem of water closure | भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देशासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद

खेड : भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यामुळे तब्बल शंभर जणांवर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
 पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे. परंतू, पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिसत आहे.
भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उप-विभाग करंजविहीरेचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे (वय ५८,रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सत्यवान नवले, बळवंत डांगले, गणेश जाधव, सचिन डांगले, तुकाराम नवले, निवृत्ती नवले, किसन बळवंत डांगले, हिरामण शिवेकर, तुकाराम शिंदे, दत्तू शिंदे, रमेश आवळे, दतात्रेय शिंदे, अनिल देशमुख, मल्हारी शिवेकर,अण्णा देव्हाडे, गणेश नवले , प्रकाश जाधव, लक्ष्मण नवले, नामदेव बांदल या एकोणीस जणांसह अन्य ८० ते १०० जणांवर भा. दं. वि. कलम ३५३, ४५२, १४१, ४३, १४७, १४९, ५०६ मु.पो.का. कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की, भामा आसखेड धरणातील पाणी सोडण्यास परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, या धरणातील पाणी सोडण्याच्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास या सुमारे ८० ते १०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संगनमताने करंजविहीरे येथील कार्यालयात जबरदस्तीने येऊन अधिकाऱ्यांना धमक्या व दमबाजी सुरु केली. आमचे पुनर्वसन झालेले नाही. आम्हाला पर्यायी जमिनी मिळालेल्या नाही. अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून एक थेंबही पाणी आम्ही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे,अभियांत्रिकी सहायक केरू दगडू पांडे, वरिष्ठ लिपिक प्रवीण वाळेकर, तानाजी गौड, बाबाजी गरुड यांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले. सर्वांनी संगनमताने शासकीय कर्तव्य पार पडण्यास अडथळा निर्माण केल्याचे अधिकारी मेमाणे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: complaint against Bhama Askhed 100 affected farmers, in connection with problem of water closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.