पहाटे आरवतो म्हणून कोंबड्याच्या विरोधात पोलिसात तक्रार !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 04:27 PM2019-05-25T16:27:31+5:302019-05-25T16:39:42+5:30
कोंबडा पहाटेच आरवतो हे सत्य असलं तरी त्याचा त्रास होणाऱ्या एका व्यक्तीने पुणे पोलिसांकङे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
पुणे : कोंबडा पहाटेच आरवतो हे सत्य असलं तरी त्याचा त्रास होणाऱ्या एका व्यक्तीने पुणे पोलिसांकङे तक्रार अर्ज दाखल केला आहे. हा विचित्र अर्ज वाचून पोलिसही चक्रावून गेले असून प्राणी हा विषय आमच्या अख्यारीत नसल्याचं सांगून त्यांनी महापालिकेच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. आता महापालिका या अर्जावर काय कार्यवाही करणार हेच बघणे औसुक्याचे ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका महिलेने नाव न देता शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. त्यात पहाटे साडेचारच्या दरम्यान कोंबडा आरवत असल्यामुळे झोप होत नसल्याचे म्हटले आहे. त्यावर पोलिसांनी अजून तरी काहीही कार्यवाही केली नाही. मात्र हा विषय पोलिसांच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत येत नाही सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, ' दोन दिवसांपूर्वी असा अर्ज दाखल झाला असून तो निनावी आहे. मात्र प्राणी हा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो, त्यामुळे आम्ही हा अर्ज निकालात काढला आहे'.