माेदींवरील वादग्रस्त पुस्तकाविराेधात पुण्यातील हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 07:55 PM2020-01-13T19:55:44+5:302020-01-13T19:56:57+5:30
माेदींवरील वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक व प्रकाशकांच्या विराेधात हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे : ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या पुस्तकावरुन वाद निर्माण झालेला असताना आता पुण्यातील हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक यांच्याविराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश टेळे यांनी तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भाजपाचे नेते जय भगवान गाेयल यांनी ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या शिर्षकाचे एक पुस्तक लिहीले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाच्या दिल्ली कार्यालयात रविवारी करण्यात आले. या पुस्तकामुळे आता माेठा वाद निर्माण झाला आहे. माेदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने या पुस्तकाला सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. राज्यात विविध ठिकाणी पुस्तकाच्या विराेधात निदर्शने करण्यात आली. आता या पुस्तकाच्या विराेधात हडपसर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार दाखल करणारे महेश टेळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काेणाशीच हाेऊ शकत नाही. त्यातच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर दंगलीचे आराेप हाेते. त्यामुळे माेदींशी तर महाराजांची तुलना कदापी शक्य नाही. त्यामुळे हे पुस्तक मागे घेण्यात यावे तसेच पुस्तकाचे लेखक, प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल.