ग्रामसेवकाची बदली केल्यास उपोषण, ग्रामपंचायतीची ग्रामसेवकांच्या कारभारविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 04:48 AM2018-03-10T04:48:49+5:302018-03-10T04:48:49+5:30
सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत.
नीरा - सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे करण्यास सहकार्य करणारे, १४व्या वित्त आयोगाचा आराखडा तसेच सांसद योजनांचा आराखडा तयार करणारे ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचून तक्रारी केल्या जात आहेत.
वास्तविक ग्रामसेवक हुशार, कार्यतत्पर तसेच प्रामाणिक कर्मचारी आहे. विविध कार्यालयांकडे त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या जात आहेत. त्यांच्या बदलीचा घाट घातला जात आहे. हा केवळ राजकीय विषय नसून तो सरकारी कर्मचाºयांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. लहान-सहान तक्रारींवर प्रशासन बदलीची कारवाई करत असल्यास हे गैर आहे. ग्रामसेवकांची नियमांचे उल्लंघन करत बदली केल्यास बुधवारपासून (दि.१४) पुरंदरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायत सदस्या आशा निगडे व इतर ग्रामस्थांनी पुरंदरच्या गटविकास अधिका-यांना दिले आहे.
गुळुंचे ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर झाले असून, यापूर्वीचे सत्ताधारींचे पॅनल पराभूत झाले आहे. सत्तेवर आल्यावर मागील पाच वर्षांच्या हिशेबाची मागणी नवीन सरपंच संभाजी कुंभार तसेच सदस्यांनी केली होती. परंतु ग्रामसेवक वेळेवर हजर नसतात, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतात तसेच पाच वर्षांतील आर्थिक रेकॉर्डमध्ये अनियमितता असल्याची शक्यता व्यक्त करत ग्रामसेवकांच्या कारभाराविरोधात सरपंच संभाजी कुंभार व सदस्यांनी गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली होती. म्हस्के यांच्याऐवजी हुशार ग्रामसेवक देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर म्हस्के यांची बदली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची जोरदार चर्चा दोन दिवसांपासून गावात सुरु होती. काही लोकप्रतिनिधींनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता.
तक्रारींमुळे त्यांची बदली करणे अयोग्य
या चर्चेच्या अनुषंगाने गावातील सदस्य व ग्रामस्थांनी म्हस्के यांच्या बदलीला विरोध केला आहे. म्हस्के यांच्या कारभारात अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर जरूर कडक कारवाई करण्यात यावी, परंतु केवळ तक्रारीमुळे त्यांची बदली करणे अयोग्य आहे.
२६ तारखेला तहकूब झालेल्या ग्रामसभेनंतर जी ग्रामसभा झाली त्यात अनेक बेकायदा विषय घेण्यात आले. या सभेच्या कार्यवाहीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी निगडे यांनी केली आहे.
सध्याचे ग्रामसेवक आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. असलेल्या योजना त्यासंबंधित शासनाकडून आलेले निधी याबद्दल विचारणा केली असता माहिती देत नाहीत. मागील पंचवार्षिकमध्ये झालेल्या खर्चाचा हिशेब देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. कार्यालयात नियमित हजर नसतात. लोकांची कामे अडून राहतात. त्यामुळे आम्ही दुसरा ग्रामसेवक मिळावा अशी मागणी गटविकास अधिकाºयांकडे केली होती.
- संभाजी कुंभार, सरपंच, गुळूंचे