पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार तडजोडीअंती निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:07+5:302021-04-24T04:10:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीने खोटा जबाब दिल्याकारणावरून पतीने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती. तडजोडीअंती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीने खोटा जबाब दिल्याकारणावरून पतीने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली होती. तडजोडीअंती त्याने ती तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पती बँगलोरचा असल्याने जिल्हाबंदीमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली. यावेळी अॅड. हेमंत झंजाड यांनी अर्जदाराचा जबाब व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे नोंदवावा, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांनी ती मान्य करत हा दावा निकाली काढला.
राहुल आणि सोनिया (नावे बदलेली आहेत.) अशी त्यांची नावे आहेत. राहुल बंगळुरूचा राहणारा, तर सोनिया पुण्याची. २००७ मध्ये विवाह झाल्यानंतर २०११ साली घटस्फोटाचा दावा दाखल केला. यावेळी न्यायालयात अन्य दावेही चालू होते. यादरम्यान, एका दाव्यामध्ये सोनियाने न्यायालयात खोटा जबाब दिला. या कारणावरून राहुल याने तिच्याविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार २०१५ साली दिली. अॅड. झंजाड यांच्यामार्फत दाखल केलेली तक्रार अनेक वर्षं न्यायालयात सुनावणी सुरू होऊन प्रलंबित राहिली. यादरम्यान, न्यायाधीशांनी दोघांनी आपसांत तडजोड करावी या उद्देशाने दोघांनाही त्याबाबत समज दिली. त्यानुसार दोघांनीही आपापसांत चर्चा करून दाव्यामध्ये तडजोड करण्याचे मान्य केले.