आरटीओची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:18 AM2017-08-09T04:18:54+5:302017-08-09T04:18:54+5:30
रिक्षा परवान्यासाठी (परमिट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी कॅशलेस लाच स्वीकारल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षा परवान्यासाठी (परमिट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी कॅशलेस लाच स्वीकारल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरटीओने मंगळवारी पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार दाखल केली.
एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याचे ‘लोकमतने’ उघड केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आरटीओने पोलिसांबरोबरच या माहितीच्या नोंदणीची जबाबदारी असणाºया नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडे (एनआयसी) याची तक्रार केली आहे. मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी पैसे घेणाºया व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची भेट घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आरटीओकडून सध्या शंभर जणांना दररोज मुलाखतीसाठी बोलावले जाते. अर्जदारांच्या अर्जाची नोंदणी झाल्यानंतर संबंधित अर्जदाराला मुलाखतीच्या तारखेचा एसएमएस पाठविला जातो. हजारोने आलेले अर्ज आणि दररोज शंभरच जणांची मुलाखत होणार असल्याने आत्ताच्या दाखल अर्जानुसार (दहा हजार) देखील शंभर कार्यालयीन कामाचे दिवस लागतील. याच अडचणीचा फायदा घेऊन एक व्यक्ती संदीप सानप या नावाने रिक्षाचालकांना फोन करून, मुलाखतीची तारीख देण्यासाठी दोनशे रुपयांची मागणी करीत होता. ही लाच पेटीएमद्वारे स्वीकारत असल्याचे ‘लोकमत’ने उघड केले.
परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची रांग
राज्य सरकारने रिक्षा परवाने खुले केल्यानंतर, परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. शनिवारी (दि.५) रात्रीपर्यंत आरटीओकडे तब्बल १० हजार अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची प्रक्रिया ही आॅनलाईन आहे. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित अर्जदाराला आरटीओकडे मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यात अर्जाबरोबर जोडलेल्या वाहन परवाना, बॅज, नामनिर्देशन पत्र, पोलिसांचे चारित्र्य पडताळणी अहवाल, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला याच्या मूळ प्रतिंची तपासणी केली जाते. या पडताळणीत पास झाल्यास संबंधिताला परवाना क्रमांक दिला जातो.
ंमुलाखतीसाठी आॅनलाईन पैसे मागणाºया व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या शिवाय रिक्षा परवान्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही व्हावी, अर्जदारांना मुलाखतीची तारीख सुलभतेने मिळावी आणि या प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडे केली आहे.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी