निष्काळजी डॉक्टरांवर गुन्हा, निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:15 AM2018-08-25T01:15:33+5:302018-08-25T01:16:27+5:30
गरोदर महिलेच्या पोटातील बाळ अपंग असतानाही त्याची माहिती महिलेस दिली नाही. यामुळे बाळ अपंग जन्मास आले. तसेच बाळाच्या जिवितास धोका निर्माण झाला. याप्रकरणी उपचार देत
पिंपरी : गरोदर महिलेच्या पोटातील बाळ अपंग असतानाही त्याची माहिती महिलेस दिली नाही. यामुळे बाळ अपंग जन्मास आले. तसेच बाळाच्या जिवितास धोका निर्माण झाला. याप्रकरणी उपचार देत असलेले डॉक्टर आणि सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल भाऊसाहेब घोडके (वय २९, रा. गणेश कॉलनी, पाटीलनगर, चिखली, मूळ-शेवगाव, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी डॉ. प्रदीप पंडित गिरीगोसावी, डॉ. दीपाली प्रदीप गिरीगोसावी (दोघेही रा. अश्वमेध नर्सिंग होम, पाटीलनगर, चिंचवड), डॉ. हर्षद आदिक, डॉ. अशीष अडसुळे (दोघेही रा. आशीर्वाद डायग्नोस्टिक सेंटर, थरमॅक्स चौक, चिंचवड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. हर्षद आदिक व डॉ. आशीष अडसुळे यांनी सीमा स्वप्निल घोडके यांच्या आशीर्वाद डायग्नोस्टिक सेंटर येथे सोनोग्राफी केली. सीमा यांचे पोटातील बाळ अपंग असताना याबाबतची माहिती घोडके दाम्पत्याला दिली नाही. तसेच डॉ. प्रदीप गिरीगोसावी व डॉ. दीपाली गिरीगोसावी यांनीही आदिक व अडसुळे यांनी केलेल्या सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहून बाळाला कुठलेही व्यंग नसल्याचे सांगितले. तसेच बाळ ठीक असल्याचे सांगून निष्काळजीपणा केला. यामुळे बाळ अपंग जन्माला आले असून, बाळाच्या डाव्या हाताच्या पंजाला तीनच बोटे आहेत. डावा पंजा अर्धवट आहे. डावा हात पूर्णपणे अपंग असून, त्याला एक हाड व कोपरा नाही. तसेच शौचाची जागा नाही. त्यामुळे बाळाच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीचा अहवालानंतर गुन्हा दाखल केला आहे.