जागा खरेदी व्यवहारात दाम्पत्याची फसवणूक केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:15+5:302021-04-22T04:11:15+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोनाली सुशील शिंदे या महिलने फिर्याद दिली. त्यानुसार इम्रान जब्बार पठाण (स्टेशन रोड, रचना ...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोनाली सुशील शिंदे या महिलने फिर्याद दिली. त्यानुसार इम्रान जब्बार पठाण (स्टेशन रोड, रचना मार्केट, बारामती) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागा नावावर करून देण्याचा आग्रह धरला असता तुम्हा दोघांना मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत सोनाली सुशील शिंदे या महिलने फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केलेला मजकूर असा, इम्रान व सुशील शिंदे हे मित्र आहेत. शिंदे यांनी घर बांधण्यासाठी गुणवडी येथील २ गुंठे जागा सव्वा लाख रुपयांना घेतली होती. ही जागा इम्रान याने बघितल्यानंतर त्याने जागा खराब असल्याचे सांगून शिंदे दांपत्याला ती विकण्यास भाग पाडले. त्या बदल्यात बारामतीत चांगल्या ठिकाणी तुम्हाला जागा घेऊन देतो, असे आश्वासन त्याने दिले होते. त्यानुसार पठाण याच्या सांगण्यावरून ती जागा मुजफ्फर सलिम रंगरेज यांना विकण्यात आली. काही दिवसांनंतर त्याने शहरातील बारामती हॉस्पिटलनजीक एक गुंठे जागा या दाम्पत्याला दाखवली. ही जागा चांगली असल्याने शिंदे यांनी ती खरेदी घेण्याची तयारी दाखवली. त्यानंतर पठाण याने या जागेचे खरेदीखत होत नसून स्टॅम्पवर नोटरी करून घ्यावी लागेल, असे सांगितले. रीतसर खरेदीखत होत नसल्याने शिंदे यांनी जागा घेण्यास नकार दर्शवला. परंतु त्यानंतरही त्याने वारंवार विनंती केली. अशी जागा पुन्हा मिळणार नाही, तुम्ही ती घ्या, अशी गळ घातली. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधित जागा मालकाला देण्यासाठी ५० हजार रुपये विसार रक्कम देण्यात आली.
त्यानंतर नोटरीबाबत विचारणा केली असता तो दुर्लक्ष करू लागला. विविध कारणे सांगू लागला. जागा नको, पैसे माघारी द्या अशी मागणी केली असता तुमच्या नावावर शेतजमीन नाही. त्यामुळे तुम्हाला ही जागा घेता येत नाही. ती जागा माझ्या नावावर घेऊ, पुढे ती तुमच्या नावे करू, असे त्याने सुचवले. त्यानुसार शिंदे दाम्पत्याने त्याच्याकडे चार लाख रुपये दिले. जागा नावावर करून देण्याची मागणी केली असता तो पलटला. त्याने ही जागा माझ्या नावावर आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगत फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी केली. सतत तगादा लावला असता माझे राजकीय संबंध आहेत. तुम्हा दोघांना मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
————————————————