तक्रार समिती विद्यार्थ्यांसाठी नाही, तर शिक्षकांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:00 AM2018-05-03T07:00:09+5:302018-05-03T07:00:50+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ही समिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना, त्यांची विविध विषयांवर सातत्याने आंदोलने होत असताना अद्याप विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली नाही.
नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात येणाºया अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रेंगाळणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, प्राध्यापकांकडून दिला जाणारा त्रास आदी विविध प्रश्नांबाबत दाद मागण्यासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून ही समिती स्थापन करण्यात आलेली नाही.
विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात ही समिती केवळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या तक्रार निवारणासाठी स्थापन झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी तक्रार निवारणाची जबाबदारी विद्यार्थी कल्याण मंडळावर सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे काम अद्यापही रेंगाळलेले आहे.
विद्यापीठात विद्यार्थ्यांना सातत्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलनेही केली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी तक्रार निवारण समितीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या तक्रार निवारण समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी घेणेही बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तक्रार निवारण समिती स्थापन कधी होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांसाठी स्थापन केलेल्या डॉ. माधव गोडबोले यांच्या समितीमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे यांचा समावेश आहे.
लोकपाल
कधी नेमणार?
विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल हे पद
निर्माण केले जावे, असे विद्यापीठ कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थी तक्रार निवारण समितीबरोबरच लोकपालाची नेमणूकही प्रलंबितच आहे.