३ वर्षात पावणे चौदा लाखांवर डल्ला; गृहसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर कोथरुडमध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:59 PM2018-02-09T14:59:42+5:302018-02-09T15:03:23+5:30
वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे : वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहकार विभागाच्या जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोथरुडमधील सहजानंद सहकारी गृहरचना संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सचिव सविता देसाई आणि खजिनदार अनिल काळे अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना २०१३ ते १५ या कालावधीत घडली. सहकार विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून हा अपहार उघड झाला. त्यावरुन लेखापरीक्षक राजेश भुजबळ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष कुलकर्णी आणि सचिव देसाई यांनी वकीलाच्या फी पोटी ४ लाख ७० हजार ९४० रुपयांचा अपहार केला असून, त्यांनी वैयक्तिक प्रवास खर्चापोटी संस्थेच्या खात्यातून ५७ हजार २५० रुपये काढले. तसेच पीएमसी न्यायालयात जामिनाकरीता प्रत्येकी ५ हजार असे दहा हजार रुपये काढले. या शिवाय प्रवास खर्चापोटी ४०० रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेच्या आवारातील पालवी बागेतील १० मोठी झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यात आली. त्याचे १० हजार ३९६ किलो लाकडाची विक्री करुन संस्थेच्या ३ लाख ६३ हजार ९६८ रुपये रक्कमेचा कुलकर्णी, देसाई आणि काळे यांनी अपहार केला.
संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण शुल्कातही अनियमितता दिसून येत आहे. वैधानिक लेखापरीक्षणाची तीन वर्षांची फी २२ हजार १६ रुपये असता तिघा आरोपींनी पोटी व्ही. एम. मठकरी अॅण्ड कंपनीला १ लाख ६५ हजार ७७४ रुपये दिले. त्यामुळे संस्थेचे १ लाख ४३ हजार ७५८ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. काळे यांनी त्यांच्या मुलीच्या नावे काम दाखवून मानधनापोटी ४८ हजार ३०६ रुपये संस्थेच्या खात्यातून काढले. किरकोळ खर्चापोटी तीन वर्षांत १ लाख १२ हजार ३६ रुपयांचे नुकसान केले. काळे व देसाई यांनी संस्थेच्या खात्यातून प्रत्येकी १५ हजार रुपये नियमबाह्यपणे काढले. या शिवाय २०१५-१६च्या ताळेबंदात १ लाख ३२ हजार ४३० रुपयांची बोगस देणी दाखवून संस्थेतील सभासदांची अर्थिक फसवणूक केली. असा एकूण १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.