गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:39 PM2020-01-20T12:39:42+5:302020-01-20T12:41:16+5:30
गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए तसेच एनआरसी विराेधात आंदाेलन करणाऱ्या आंदाेलकांच्या विराेधात तक्रार दाखल केली आहे.
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गाैरव बापट यांनी जंगली महाराज रस्त्यावर सीएए, एनआरसी विराेधात आंदाेलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विराेधात डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आंदाेलनकर्त्यांनी मध्यरात्री देशविराेधी घाेषणा दिल्या तसेच हुल्लडबाजी केली असल्याची तक्रार या अर्जात करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील शाहीनबाग येथे महिलांकडून सीएए आणि एनआरसी विराेधात आंदाेलन सुरु आहे. या आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी 'एक रात शाहीनबाग के नाम' या आंदाेलनाचे स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती, अन्नपूर्णा परिवार, हम भारत के लोग या संस्थांकडून आयाेजन करण्यात आले हाेते. 18 जानेवारी राेजी संध्याकाळी 6 वाजता या आंदाेलनाला सुरुवात करण्यात आली. हे आंदाेलन 19 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु हाेते. या आंदाेलनात विविध गाणी तसेच, भाषणे करण्यात आली. याच आंदाेलनाच्या विराेधात गाैरव बापट यांनी तक्रार दाखल केली आहे. काेणत्याही परवानगी न घेता तसेच सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश माेडत अपरात्री देशविराेधी घाेषणा दिला गेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
दरम्यान आंदाेलनासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या हाेत्या असे आयाेजकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच रात्री 10 नंतर माईक बंद केला असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.