पुण्यात कर्वेनगरच्या डीपी रस्त्यासाठी २५० वृक्षांवर कुऱ्हाड : एनजीटीकडे दावा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:21 AM2019-09-16T11:21:37+5:302019-09-16T11:45:54+5:30
रस्ते विभागाला डीपी रस्त्यावरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली आहे....
पुणे : कर्वेनगरच्या महालक्ष्मी लॉन्स ते कमिन्स महाविद्यालया दरम्यानच्या २० फूटी डीपी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या २५० झाडांची कत्तल होणार असून, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने त्याला मंजुरी दिली आहे. काही झाडे तोडण्यात आली आहेत. काही नागरिकांनी त्यास विरोध केला आहे. त्यामुळे येतील वृक्षतोडीचे काम थांबविण्यात आले आहे.
शहरात ठिकठिकाणी विकासकामे जोरात सुरू असून, त्यासाठी हजारो वृक्षांची तोड करण्यात येत आहे. डीपी रस्त्यासाठी देखील वृक्ष प्राधिकरण, वारजे कर्वेनगर यांच्यातर्फे ८८ वृक्ष काढण्यास, १६२ पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली आहे. या झाडांच्या बदल्यात ७५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. परंतु, त्याबाबतही संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण ही झाडे लावायची कोणी ? यावर एकमत नाही. पुणे महापालिकेच्या रस्ते विभागाला ही परवानगी दिली आहे. त्याबदल्यात त्यांनी झाडे लावणे अपेक्षित आहे. पण पुणे महापालिका रस्ते विभागाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ही माहिती वृक्ष प्राधिकरणाकडून घ्यावी, असे सांगितले. तर वृक्ष प्राधिकरण म्हणते, ही माहिती रस्ते विभागाशी निगडित आहे. दोन्ही विभागाकडून टोलवाटोलवी होत आहे. त्यामुळे केवळ झाडे तोडली जात असून, लावण्याबाबत मात्र काहीच निर्णय झालेला नाही, असा आरोप पर्यावरण अभ्यासक चैतन्य केत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशी गिरीश जैन यांनी या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी वृक्षतोड थांबविण्यात आलेली आहे.
विकासकामांसाठी वृक्षतोड याविषयी पर्यावरण अभ्यासक चैतन्य केत म्हणाले, सध्या शहरात विकास कामांच्या नावाखाली वृक्षतोड केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा व्यवस्थित व्हावी, यासाठी देखील ठिकठिकाणी रस्त्यात येणाºया झाडांवर कुºहाड चालविण्यात आली. पर्यावरणाचे मोठे नुकसान करण्यात येत आहे. कर्वेनगर येथील डीपी रोडसाठी देखील २५० झाडे तोडली जात आहेत.
वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु, त्यावर काही होईल असे वाटत नाही. तरी देखील आम्ही प्रयत्न करीत आहोत. नागरिकांनी या तोडीविरोधात प्रतिसाद देणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रकार सुरूच राहिल.
- गिरीश जैन,राष्ट्रीय हरित लवादाकडे अर्ज देणारे तक्रारदार
........
रस्ते विभागाला डीपी रस्त्यावरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली आहे. त्यांनीच ही झाडे लावायचे आहे. त्याबाबतचा निर्णय झालेला आहे. त्यांनी काही झाडे दुभाजकांमध्ये लावली आहेत. तर काही नदी काठी लावणार आहेत.
-स्नेहल हरपळे, सहाय्यक उद्यान अधिक्षक, महापालिका