‘जम्बो’ डॉक्टरांच्या अजित पवारांकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:54+5:302021-03-30T04:08:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अतिजलद गतीने, गाजावाजा करत सुरू केलेले जम्बो रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात ...

Complaint to 'jumbo' doctor Ajit Pawar | ‘जम्बो’ डॉक्टरांच्या अजित पवारांकडे तक्रारी

‘जम्बो’ डॉक्टरांच्या अजित पवारांकडे तक्रारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अतिजलद गतीने, गाजावाजा करत सुरू केलेले जम्बो रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात सापडले आहे. जम्बो आणि वाद हे समीकरणच त्यातून तयार झाले आहे. आताही जम्बो सुरू होऊन आठ दिवस उलटत नाही तोच नवा वाद उफाळून आला आहे. या रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागातील ४ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी थेट बारामती गाठली. मात्र, त्यांची भेट न झाल्याने पत्राद्वारे तक्रारींचा पाढाच वाचला असून काही मागण्यादेखील केल्या आहेत.

राज्यात कोरोना संकट गडद होत आहे. पुण्यात दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासन, पुणेकर अशा सर्वांचेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालय पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. मात्र या रुग्णालयातल्या सध्याच्या वैद्यकीय सुविधांमधील त्रुटींबाबत येथील ४ डॉक्टरांनी थेट पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे गाऱ्हाणे मांडले आहे.

या पत्रात डॉक्टर म्हणतात, “कोविडची आत्ताची लाट पहिल्यापेक्षाही फार भयंकर आहे. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध होण्यात खूप अडचणी येत आहे. पुन्हा सुरू करण्यात आलेले जम्बो झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या सेवेत कमी पडत आहे. त्यात भर म्हणजे अतिदक्षता विभागात अननुभवी डॉक्टरांची भरती करण्यात आली असून तेथील मृत्यूदर वाढला आहे. अशा परिस्थितीत पहिले ५ महिने येथे कामाचा अनुभव असलेल्या डॉक्टरांची पुन्हा भरती करण्यात यावी. मात्र पहिल्या ५ महिने काम केलेल्या डॉक्टरांचे पगार थकीत आहे. त्यामुळे तिथे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ काम करण्यास तयार नाही.” परंतु, आता आयसीयूमध्ये पुन्हा जुन्या डॉक्टरांची भरती करून त्यांचे वेतन थेट महापालिकेद्वारे करण्यात यावे, असाही उल्लेख पत्रात अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी केला आहे.

या संदर्भात जम्बो प्रशासनाशी संपर्क साधला असता अधिष्ठाता (डीन) डॉ. श्रीयांश कपाले म्हणाले की, सर्व लोकांचे पगार करण्यात आले आहेत. काही संस्था वगळता सर्वांची बिले देखील देण्यात आली आहेत. या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात नाही. पत्रावरची सहीदेखील संशयास्पद वाटत आहे. पगारावरुन चर्चा केली जात असतेच. सध्या जम्बोमध्ये ५०० रुग्णांना पुरेसा होईल इतका स्टाफ आहे. ‘जम्बो’ला बदनाम करण्याचा प्रयत्न दिसत आहे. जम्बो कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाशी कोणीही याबाबत संपर्क साधलेला नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत आम्ही पोलीस तक्रार करत आहेत. तसेच तपासदेखील करण्यात येईल.

Web Title: Complaint to 'jumbo' doctor Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.