राज ठाकरेंच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:55 PM2023-03-23T13:55:00+5:302023-03-23T14:01:13+5:30
राज ठाकरेंच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना तक्रारीत नमूद
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर मेळावा झाला. या मैदानात लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी राज यांनी मशिदीवरील भोंगे आणि माहीम येथील अनधिकृत मजार यावर भाष्य केले. त्यानंतर आज राज ठाकरेंवर समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पिंपरीतील वाकड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजीद राजाक सय्यद नावाच्या एका व्यक्तिने ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुढीपाडवानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप केला आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याची दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात येत आहे. त्यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची संभावना असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
राजधानी मुंबईच्या माहिम भागातील समुद्रात असलेल्या कथित मजारीवरून आता रणकंदन पेटण्याची चिन्हे आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहिममध्ये अनाधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा करत थेट ड्रोन फुटेजच गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत दाखवले. हे फुटेज दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका, सरकार आणि पोलीस प्रशासनाला इशारा देत महिनाभरात याठिकाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही तर त्याचशेजारी मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा दिला. तसेच मशिदीवरील भोंगे यांचा मुद्दाही ठाकरे रोखून धरला होता.