राम कदम यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार : सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 10:04 PM2018-09-05T22:04:19+5:302018-09-05T22:05:07+5:30
भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.
पुणे : भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा अर्ज दिला आहे.
घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. मुलींना पळवून आणण्यास मदत करेल या वक्तव्याचा सर्व स्तरातील महिलांनी समाचार घेतला आहे. याच संदर्भात चाकणकर यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यात कदम यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचे म्हटले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या विषयावर चाकणकर म्हणाल्या की, कदम यांचे वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. परिचारक, दानवे, छिंदम अशा भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत कदम अव्वल ठरले आहेत. त्यांच्या या वाक्यामुळे समस्त महाराष्ट्राच्या माता- भगिनींचा अपमान झाला असल्याने या संबंधीचा अर्ज दिला आहे. अविचारीपणे महिलांबद्दल जीभ सैल सोडून बोलणाऱ्या कदम यांनी फक्त माफीनामा नाही तर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली.