अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिल्याप्रकरणी वडील आणि चुलत्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:15 PM2018-05-10T13:15:58+5:302018-05-10T13:15:58+5:30
लहान मुलांना गाडी चालवायला दिली म्हणून वडिलांना अटक अशा प्रकारच्या कारवाईची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे.
पुणे : कर्वेनगर येथे विना रजिस्ट्रेशन आणि बनावट नंबरने वापरत असलेल्या दुचाकी संदर्भात अल्पवयीन मुलाला वारजे वाहतूक पोलिसांनी बुधवारी अटक केली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात मुलाच्या वडील व चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
धनंजय बनसोडे आणि करण बनसोडे अशी अटक व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे. शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे वाहतूक पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवताना चांदणी चौक येथे थांबवले आणि कागदपत्रे मागणी केली असता मुलाने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाकडे पोलिसांनी गाडीविषयी कसून चौकशी केल्यावर सुमारे आठ महिन्यांपूर्वी होन्डा अॅक्टीवा ही गाडी धनंजय बनसोडे यांनी विकत घेतली होती. पण तेव्हापासून ही दुचाकी रजिस्ट्रेशन केलेली नाही. तसेच दुचाकीवर असलेला (एमएच १२ पीआर ०७८९) हा नंबर देखील बनावट असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, पोलीस हवालदार तानाजी नागरे, अविनाश गोपनर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला .