दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षांच्या पत्नीविरोधात पीएनजीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 01:01 PM2019-07-25T13:01:47+5:302019-07-25T13:11:51+5:30
पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या दुकानातून तब्बल ४४ लाख रुपयांचे दागिने खरेदी केली आहे़...
पुणे : पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या दुकानातून तब्बल ४४ लाख रुपयांचे दागिने खरेदी करून त्याबाबत दिलेले धनादेश वटले नाहीत़. त्यानंतरही त्याचे पैसे न दिल्याने पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या पत्नी शारदा गोडसे यांच्याविरोधात दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे़.
पीएनजीचे संचालक पराग गाडगीळ यांनी गेल्या महिन्यात दिवाणी न्यायालयात ही तक्रार दिली आहे़. त्याबाबत त्यांनी सांगितले, की शारदा गोडसे यांनी ऑक्टोबर २०१८ पासून सुमारे ४४ लाख रुपये किमतीचे सोने खरेदी केले होते. त्याबदल्यात त्यांनी पुढील तारखांचे धनादेश दिले. धनादेशाची मुदत संपत आल्यानंतर ते चेक भरू नका, अशी विनंती त्या करीत. पैसे न दिल्याने दागिने परत करा, अशी त्यांच्याकडे मागणी केली होती़. मात्र ते सोने मी एका ठिकाणी गुंतवले होते़. त्यात माझी फसवणूक झाली असून सध्या ते सोने माझ्याकडे नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आमचे पैसे परत करावे, यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेतली असून गोडसे यांना समन्स जारी होणार आहे.
गोडसे यांनी दिलेला सुमारे ५३ लाख रुपयांचा एक धनादेश पीएनजीने बँकेत जमा केला होता. मात्र तो धनादेश असलेले खातेच बंद करण्यात आले होते़. तेव्हा पीएनजीने गोडसे यांच्याशी संपर्क केला. त्यावर त्यांनी लवकरच पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र या घटनेला ९ महिने उलटूनही पैसे किंवा सोने न दिल्याने तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत शारदा गोडसे यांनी सांगितले, की मी एका चिटफंडमध्ये गुंतवणूक केली होती. त्या ठिकाणी माझी फसवणूक झाली असून त्याबाबत फरासखाना पोलिसांत गुन्हादेखील दाखल आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी माझ्याकडून विविध कारणांनी पैसे उकळले. गुंतवलेले पैसे परत पाहिजे असेल तर सुरक्षेची हमी म्हणून सोने जमा करावे लागेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी मी पीएनजीमधून सोने घेतले. गुंतवणूक केलेले पैसे आल्यानंतर पीएनजीचे पैसे परत करणार होते. मात्र, तेथे फसवणूक झाल्याने मी पैसे परत करू शकले नाही, असे त्यांनी सांगितले़ याबाबत पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे़.
.......
१ कोटी ६८ लाखांछी फसवणूक
सासऱ्यांच्या नावाने असलेल्या फंड खात्यातील रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने शारदा गोडसे यांची १ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती़.
* याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात ३४ संस्थांच्या महिलांसह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१३ ते २०१९ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा दिल्ली, हरियाना, कर्नाटक येथे जाऊन शोध घेतला; परंतु कोणीही आरोपी अद्याप मिळून आलेले नाही़.