तक्रार देण्याची धमकी दिल्याची फिर्याद
By admin | Published: April 24, 2017 04:25 AM2017-04-24T04:25:45+5:302017-04-24T04:25:45+5:30
बावड्यातील दहा जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद देणाऱ्या चुलत्या पुतण्यांविरुद्ध गेल्या गुरुवारी (दि. २०) या प्रकरणातील एका आरोपीने,
इंदापूर : बावड्यातील दहा जणांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद देणाऱ्या चुलत्या पुतण्यांविरुद्ध गेल्या गुरुवारी (दि. २०) या प्रकरणातील एका आरोपीने, मारहाण करून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले, तसेच तक्रार केल्यास दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार देण्याची धमकी दिल्याची फिर्याद बावडा पोलिसांकडे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिगंबर मारुती यादव (वय ४२, रा. बागलफाटा, बावडा) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्यासह सुमारे २५ जणांविरुद्ध लहू गायकवाड (रा. बावडा) याने आज इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर यादव हे बावड्यातील बाजीराव पाटील विकास संस्थेचे सचिव आहेत. १७ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता लहू गायकवाड व लक्ष्मण गायकवाड हे विकास संस्थेच्या कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादीकडे अमर पाटील कोठे आहेत, याची चौकशी केली. फिर्यादीने आपणास माहीत नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यास शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या खिशात असणारे संस्थेच्या सभासदांचे भरणा करावयाचे दोन हजार रुपये लहू गायकवाड याने काढून घेतले. तक्रार केल्यास दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद यादव यांनी २० एप्रिल रोजी दिली होती. गुन्हा रजिस्टर नंबर १३४/२०१७ अन्वये ती बावडा पोलिसांकडे नोंदवली गेली आहे.