पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच गुन्हा दाखल
By Admin | Published: November 8, 2016 01:49 AM2016-11-08T01:49:53+5:302016-11-08T01:49:53+5:30
बेकायदेशीरपणे वृक्षतोड झाल्याप्रकरणी उद्यान विभागातील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता, त्याला शिवीगाळ केली म्हणून माझ्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे : बेकायदेशीरपणे वृक्षतोड झाल्याप्रकरणी उद्यान विभागातील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता, त्याला शिवीगाळ केली म्हणून माझ्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दबावामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला, असा धक्कादायक आरोप मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला.
महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या प्रभागात झालेली बेकायदेशीर वृक्षतोड व त्यावरून त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा याची माहिती दिली. त्या वेळी भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, नगरसेवक अशोक येनपुरे यांनी त्याला आक्षेप घेऊन उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याची बाजू लावून धरली. त्यानंतर मनसेचे गटनेते किशोर शिंदे, नगरसेवक बाळा शेडगे हे धंगेकर यांच्या मदतीला धावून आले.
रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘‘पालकमंत्री छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत. त्यावरून ते बघून घेऊ, अशा धमक्या देतात. पालिकेचा एक सेवक त्यांच्या घरी दळण आणण्याचे काम करतो. मला रविवारी पोलीस ठाण्यातून फोन आला, आमच्यावर मंत्र्यांचा दबाव असून, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. महापालिकेचा सेवक बेकायदेशीर वृक्षतोड करीत असल्याने तो गंभीर प्रकार आहे. त्यामुळे जोपर्यंत त्याच्याविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत माझे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.’’
बाळा शेडगे यांनी बेकायदशीरपणे वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. याप्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध उद्यान विभागाकडून काय कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, याची विचारणा किशोर शिंदे यांनी केली.
प्रशासन निष्पक्षपातीपणे काम करीत नाहीत. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले असता, त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही, अशी टीका अविनाश बागवे यांनी केली.
भाजपा व मनसेच्या नेत्यांनी महापौरांच्या दालनात बसून हा विषय संपवावा, अशी सूचना सभागृह नेते बंडू केमसे व काँग्रेसच्या ज्येष्ठ
नगरसेविका कमल व्यवहारे यांनी या वेळी केल्या. (प्रतिनिधी)