पुणे शहरातील‘संधीसाधू’दुकानदारांची मुजोरी सुरुच;ग्राहक पंचायतीकडे 25 हून अधिक तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:00 AM2020-05-28T06:00:00+5:302020-05-28T06:00:14+5:30
लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे.
युगंधर ताजणे
पुणे : अव्वाच्या सव्वा दरात वस्तुंची विक्री करणे, आपण सांगु त्याच भावात वस्तु खरेदी करावी लागेल अन्यथा दुस-या दुकानात जावे अशा प्रकारची भाषा काही दुकानदार वापरु लागले आहेत. लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना नाडण्याचे काम सुरु आहे. ग्राहकाला हवी असणारी वस्तु दुकानात असतानाही ती न देणे, चढया दराने त्याची विक्री करणे, बिल न देणे, संघटनेकडून दर ठरवून दिले असताना देखील अवाजवी दर आकारण्याचे प्रकार समोर आले आहेत. ग्राहक पंचायतीकडे याविषयी 25 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अनेक संधीसाधू व्यापारी ग्राहकांना अनेक वस्तूंच्या अवास्तव किमती लावत ग्राहकांचे प्रचंड आर्थिक शोषण करीत आहेत. शुक्रवार पेठेतील काही किराणा मालाच्या व्यापा-यांविरुद्ध पंचायतीकडे तक्रारी आलेल्या आहेत. काही जागृत ग्राहकांनी संबंधित दुकानांमध्ये वस्तूंचे दर कशा पद्धतीने आकारले जात आहेत हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठी काही दुकानांच्या (कच्चा) बिलांचे फोटोही ग्राहक पंचायतीकडे पाठवले आहेत.ते फोटो पाहून ग्राहकांची तक्रार रास्त आहे असे जाणवल्यामुळे पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड वस्तूंच्या(होलसेल)किमती विषयी चौकशी केली. याविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष विलास लेले म्हणाले, लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक सुरुच आहे. फसवणूक करणा-या दुकानदारांविषयी किराणा माल संघटनेच्या पदाधिका-यांना विचारणा केली आहे. तसेच पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांना देखील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. दुकानदारांनी अशीच फसवणूक सुरु ठेवल्यास त्यांच्याबद्द्लची माहिती सोशल माध्यमांवर नाईलाजास्तव व्हायरल करण्यात येईल.
ग्राहकांची फसवणूक करुन मनमानी दर आकारले जात आहे. त्यांना जीएसटी चे पक्के बिलही दिले जात नाही तसेच सरकारचा टॅक्स ही चुकवला जात आहे. यावर योग्य उपाय व्हावा म्हणूनच पंचायती मार्फत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी व जीएसटी कौन्सिल यांना देण्यात येणार आहे. ग्राहकांना पक्के बिल द्यावे व ग्राहकांचे आर्थिक शोषण होणार नाही इतका नफा कमवावा. अशी विनंती व्यापारी वर्गाला पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
* अशीही ही बनवाबनवी ...
- उत्तम दर्जाची हळकुंड ११० ते १२० रु.किलो या दराने उपलब्ध असताना ती ग्राहकाला २४० रु.किलो या दराने विकण्यात येत आहे.
- एका कंपनीचा हिंग २०० ग्रॅमचा १ डबा होलसेल भाव १०० रुपये असा आहे. त्यावर एमआरपी २१५ रुपये आहे. ग्राहकाला हा हिंग १५० रुपयात मिळत आहे.
- मार्केटयार्ड मध्ये उत्तम दर्जाच्या छोलेचा (काबुलीचना) कट्ट्याचा भाव ८० ते ९० रुपयांच्या आसपास आहे.त्याचा भाव ग्राहकास १६० रुपये लावण्यात आलेला आहे.
- चांगल्या प्रतीचा रवा चौदाशे ते पंधराशे रुपये ५० किलोच्या पोत्याचा भाव आहे.( म्हणजे वाहतूक, वजन घाटी, प्लॅस्टिक पिशव्या इत्यादी सर्व खर्च धरून ३२ ते ३३ रुपये प्रती किलो)तो ४४ रुपये किलो या दराने ग्राहकाला विकण्यात आलेला आहे.
- कॉर्नफ्लॉवरचे ५० किलोचे पोते दोन हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. म्हणजेच साधारण ४०/५०रुपये किलोची वस्तू ग्राहकास १२० रुपये किलो या दराने विकण्यात आलेली आहे. बिलात दहा रुपये जास्तीचे वसूल केले जात असल्याचे ग्राहक पंचायतीनेच तक्रारदार ग्राहकांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे.