डीएसकेंविरोधात तक्रारींचा ओघ, दिवसभरात ठेवीदारांच्या २५८ तक्रारी, एसआयटी स्थापून चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 06:09 AM2017-11-02T06:09:05+5:302017-11-02T06:09:33+5:30
ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी़़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे.
पुणे : ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी़़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार देणाºया ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे़ बुधवारी तब्बल २५८ जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे़ आतापर्यंत पोलिसंकडे आलेल्या तक्रारीतील रकमेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ती किमान १० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे़ ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून त्यात एसआयटी स्थापन करून डीएसके यांच्या सर्व कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे़
गेल्या एक महिन्याभरापासून
डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरोधात सर्वप्रथम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीच्या तक्रारी देण्यास सुरुवात केली होती़ या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्या़ आर्थिक गुन्हे शाखेने या अर्जदारांचे जबाब नोंदविल्यानंतर २८ आॅक्टोबर रोजी डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला़ त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला आहे़ मंगळवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे एकूण ४४ तक्रारी आल्या होत्या़ त्यात फसवणूक झालेली रक्कम ४ कोटी ७८ लाख रुपये इतकी होती़ आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात डी़ एस़ के. उद्योगसमुहाविरोधात तक्रार देणाºया ठेवीदारांची बुधवारी सकाळपासून गर्दी झाली होती़ अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांतून ठेवीदार आले होते़ त्यातील बहुसंख्य हे ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी होते़ त्यांनी आपल्याला मिळालेले फंड व अन्य पैसे डीएसके उद्योगसमुहात गुंतविले आहेत़ त्यातील बहुसंख्य लोकांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुद्दल अथवा व्याजही मिळालेले नव्हते़
अहमदनगरहून आलेल्या एका दाम्पत्याने सांगितले, की आम्ही आमची सर्व पुंजी ४० लाख रुपये २००४ मध्ये गुंतविली आहे़ त्याचे व्याज गेल्या २ वर्षांपर्यंत मिळत होते़ पण, त्यानंतर मिळणे बंद झाले़
पुण्यातील एक आजीही येथे आल्या होत्या़ त्यांनी सांगितले, की मी ७ लाख रुपये गुंतविले आहेत़ त्यावरील व्याज हेच म्हातारपणातला आधार होता़ पण आता व्याजही मिळणे बंद झाले़ मुद्दल मिळाली तरी खूप झाले असे आता वाटते़
या प्रकरणी काही गुंतवणुकदारांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे़ त्यात त्यांनी म्हटले आहे, की डी. एस. कुलकर्णी यांनी घरकुल लॉन्समध्ये बोलविलेल्या बैठकीत आम्हाला त्यांच्या विविध कंपन्यांमधील मुदत ठेवींची माहिती दिली़ त्यावरून आम्ही मुदत ठेवी ठेवल्या़ आता ठेवींची मुदत संपण्याच्या वेळी आम्हाला माहिती देण्यात आली, की त्यांना मुद्दलाची रक्कम आणि त्यावरील व्याज परत देणे शक्य नाही़ त्यामुळे आम्हाला पुढील तारीख घातलेले धनादेश स्वीकारणे भाग पडले़ अनेकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले, की डी. एस. कुलकर्णी व इतरांनी आम्हा गुंतवणुकदारांच्या समोर असे चित्र उभे केले की, त्यांना मुदत ठेवी स्वीकारण्याचा अधिकार आहे़ त्यांना अधिकार नसतानाही त्यांनी आम्हाला आमिष दाखवले आणि हजारो गुंतवणुकदारांकडून प्रचंड प्रमाणात मुदत ठेव रक्कमा गोळा केल्या आणि आम्हाला फसवले आहे़ स्वतंत्र एसआयटी स्थापन करून डीएसके कुटुंबाची व त्यांच्या सर्व कंपन्यांची आणि संचालकांची योग्य ती चौकशी करण्यात यावी़ आम्ही सर्व गुंतवणूकदार हे मध्यमवर्गीय असून ९० टक्के हे ज्येष्ठ नागरिक आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, असे त्यात म्हटले आहे़