नाक, कान, घशांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:32+5:302020-11-22T09:37:32+5:30
हिवाळयाची चाहूल लागताच दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधीपर्यंत तापमान बरेच कमी झाल्यामुळे पुणेकरांनी थंडीचा अनुभव घेतला. दिवाळीच्या दिवसांमध्ये गारठा अचानक ...
हिवाळयाची चाहूल लागताच दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधीपर्यंत तापमान बरेच कमी झाल्यामुळे पुणेकरांनी थंडीचा अनुभव घेतला. दिवाळीच्या दिवसांमध्ये गारठा अचानक कमी झाला आणि तापमानात वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला. आता पुन्हा गारठा निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे अशा नैमित्तिक आजारांनी डोके वर काढले आहे.
व्हायरल आजारांचे प्रमाणही या काळात वाढले आहे. त्यामुळे नाक, कान, घशात संसर्ग होऊन आरोग्याच्या तक्रारींना आमंत्रण मिळत आहे. बदलत्या हवामानामध्ये दिवाळीमध्ये झालेल्या प्रदूषणाचीही भर पडली आहे. त्यामुळेच दिवाळीच्या आधीच्या दिवसांच्या तुलनेत सध्या कान, नाक, घशाचा त्रास उदभवलेल्या रुग्णांची संख्या ४० टक्कयांनी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
---------------------
बदलत्या हवामानाचा नाकाची नाजून अंर्तत्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे संसर्ग होऊन सर्दी वाढीस लागते. सदी घशात उतरली की घसा खवखवणे, घसा दुखणे असे त्रास सुुरु होतात. स्वरयंत्रावरही परिणाम होतो, दाह निर्माण होतो. या काळात सायनसची समस्याही डोके वर काढते. सर्दी छातीत उतरल्यास दम किंवा धाप लागणे असे त्रास उदभवू शकतात. डॉक्टरांच्या सल्लयाने वेळीच योग्य उपचार घेतल्यास तक्रारी दूर करता येऊ शकतात.
- डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ
------------------------
दिवाळीनंतर कानाच्या तक्रारींचे रुग्ण वाढले आहेत. यात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. याशिवात, अॅलर्जिक सर्दीचा त्रासही सुरु झाला आहे. कान, नाक आणि घशाच्या समस्या एकमेकांशी निगडीत असतात. रुग्णांनी गरम पाणी पिणे, वाफ घेणे, कानात कापसाचे बोळे घालणे, ताजे अन्न खाणे, व्यायाम हे सर्व नियम पाळावेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करुन घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार नियमितपणे घ्यावेत.
- डॉ. मोनालिसा डेब बर्मन, कान-नाक-घसा तज्ज्ञ