पुणे जिल्ह्यातील कृषी वीजबिलांच्या तक्रारींचे होणार तत्काळ निवारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:50 AM2022-03-11T10:50:15+5:302022-03-11T11:06:42+5:30
सकाळी १० वाजता वीजबिल दुरुस्ती मेळाव्याचे आयोजन...
पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी वीजबिलांबाबत तक्रारी असल्यास त्याचे तत्काळ निवारण करण्यासाठी मुळशी, वेल्हे, खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर व हवेली (ग्रामीण) तालुक्यांमधील सर्वच १४ उपविभाग कार्यालयांमध्ये सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता वीजबिल दुरुस्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वीजबिलांची तत्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीचा योग्य वेळेत लाभ मिळावा यासाठी येत्या सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता मुळशी, नसरापूर, उरुळी कांचन, हडपसर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर, वडगाव लोणावळा, चाकण व तळेगाव या १४ उपविभाग कार्यालयांमध्ये बिल दुरुस्तीचे मेळावे आयोजित केले आहेत. तक्रार असल्यास त्याचा लेखी अर्ज व बिलाची झेरॉक्स प्रत सोबत मावळ, आणावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. या मेळाव्यात मंजूर भार, मीटर वाचन, थकबाकी आदींबाबतच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर व हवेली (ग्रामीण) तालु क्यांमधील १ लाख २६ हजार ४६२ पैकी आतापर्यंत ४९ हजार १९ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग घेतला आहे.
या शेतकऱ्यांनी चालू बिल व थकबाकीचा १०६ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना थकबाकीमध्ये एकूण ८१ कोटी ६४ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. यामधील १८ हजार ३७४ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णत: थकबाकीमुक्त झाले आहे. या शेतकऱ्यांकडे ६४ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा केल्यामुळे थकबाकीमुक्ती सोबतच त्यांचे उर्वरित ३२ कोटी २ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.