मराठीतून अभ्यासक्रम पुर्ण करता यावा यासाठी फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या अांदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:30 PM2018-06-14T20:30:05+5:302018-06-14T20:30:05+5:30
फर्ग्युसन महाविद्यालयातील बीएच्या विद्यार्थ्यांनी इतिहास व समाजशास्त्र विषयांचे अभ्यासक्र मराठीतून पूर्ण करता यावेत यासाठी प्राचार्यांच्या खाेलीबाहेर ठिय्या अांदाेलन केले.
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा अाराेप करत बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या अांदाेलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विराेधात घाेषणा दिल्या. तसेच मराठीतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी लावून धरली.
फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अात्तापर्यंत इंग्रजी अाणि मराठी या दाेन्ही माध्यमांमधून पाॅलिटिकल सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, मानशास्त्र विषायात अभ्यासक्रम पूर्ण करता येत हाेता. परंतु महाविद्यालय प्रशासनाने इतिहास अाणि समाजशास्त्र विषयासाठी मराठीतून अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही असे अचानक जाहीर केले. त्यामुळे दुसऱ्या विर्षासाठी मराठीतून अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 50 ते 60 विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या खाेली बाहेर ठिय्या अांदाेलन केले. या अांदाेलनाला जनता दल युनायटेडचे सरचिटणीस कुलदीप अांबेकर यांनी पाठींबा दिला हाेता. याबाबत बाेलताना काैस्तुभ पाटील हा विद्यार्थी म्हणाला, महाविद्यालयाने दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रीया सुरु असताना अचानकपणे इतिहास व समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमांना मराठीतून प्रवेश घेता येणार नाही असे जाहीर केले. तसेच महाविद्यालयाला हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून घेण्यासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. परंतु इतक्या वर्ष हे अभ्यासक्रम मराठीतून हाेत असताना यंदाच्या वर्षी अचानक का बंद करण्यात येत अाहे याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने कुठलेही उत्तर दिले नाही. मराठी माध्यमाला शिकणारी मुले ही गावाकडील गरीब घरातील विद्यार्थी अाहेत. त्यांना अचानक इंग्रजीमधून अभ्यासक्रम पुर्ण करता येणे शक्य नाही. महाविद्यालयाला मराठीतील अभ्यासक्रम बंद करुन सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये करायचे अाहेत. असे झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना फर्ग्युसन मधून शिक्षण घेता येणार नाही.
महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी संध्या साेनवणे म्हणाली, या विषयाबाबत प्राचार्य व उपप्राचार्य यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून संवाद साधण्यात येत हाेता. प्रशासनाकडून अाधीपासूनच या अभ्यासक्रमांना मान्यता नसल्याचे अाधी सांगण्यात अाले. यंदाच्या वर्षापासून मराठीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे महाविद्यालयाने जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या अांदाेलन केले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी द्यावी.
------------------------------------
बीएच्या विद्यार्थ्यांना इतिहास आणि समाजशास्त्र विषयात मराठी माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याला यापूर्वी परवानगी देण्यात येत होती. मात्र, यंदापासून शिक्षण विभागाच्या नियमांनुसार हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून करता येणार नसल्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास त्यांना मराठी माध्यमातून इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी मिळण्याबाबत प्रयत्न करू. मात्र, यंदा बीए प्रथम वर्षाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमांची माहिती देऊन प्रवेश घ्यायला लावू.
- डॉ. आर. जी. परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय