सरकारी, खासगी रुग्णालयांचे अग्निशमन लेखापरीक्षण पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:26+5:302021-05-10T04:10:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीच्या गेल्या काही दिवसांतील दुर्घटना आणि माॅन्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीच्या गेल्या काही दिवसांतील दुर्घटना आणि माॅन्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे अग्निशमन लेखापरीक्षण तातडीने पूर्ण करा. तसेच येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश कोविड अग्रिशमन लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष सुहास दिवसे यांनी काढले आहेत.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कॅन्टोन्मेंट हद्दीसह पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या खासगी रुग्णालयांनी तथा सरकारी रुग्णालयांनी आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना कलम ३ पोटकलम मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयांच्या मध्ये बसविलेल्या आग प्रतिबंधक उपाययोजनांचे अग्निशमन लेखापरीक्षण मान्यताप्राप्त ‘अ’, ‘ब’, किंवा ‘क’ या फायर लायसन्स एजन्सीकडून करून सर्व आवश्यक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत ठेवाव्यात. तसेच लेखापरीक्षणात आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता पुढील १५ दिवसांत करावी. त्यासंबंधीचा कार्यपूर्ती अहवाल संबंधित आपल्या कार्यक्षेत्रात येणाच्या मुख्य अग्निशमन अधिकारी यांना करावा. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणेसोबतच रुग्णालयांच्या संपूर्ण विद्युतबाबतचे स्वतंत्र लेखापरीक्षण करावे, असे देखील आदेश दिले आहेत.
शासन मान्यताप्राप्त फायर लायसन्स एजन्सी यांची यादी maharashtrafiresevrvice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, ज्या इमारतींमध्ये आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा बसविलेली नाही. त्यांनी तत्काळ मान्यताप्राप्त फायर लायसन्स एजन्सीकडून बसवून घेऊन नियमाप्रमाणे आवश्यक असलेले प्रमाणपत्र (Form-A) विहित कालावधीत सादर करावे/अथवा शासन मान्यताप्राप्त फायर लायसन्स एजन्सीकडून सध्या असलेली अग्निशमन यंत्रणा योग्य रीतीने कार्यान्वित असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र (Form B) आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुख्य अग्निशमन अधिकारी यांना सादर करावा, असे देखील स्पष्ट कळविले आहे.