Pune Metro: मेट्रो प्रवास ९० मिनिटांत उरका; नाहीतर तासाला ५० रुपयांपर्यंत दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:07 PM2023-12-01T13:07:34+5:302023-12-01T13:08:12+5:30
पुणे मेट्रोने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे...
पिंपरी : तिकीट खरेदी केल्यापासून ९० मिनिटांमध्ये ज्या स्थानकावर जायचे आहे, त्या स्थानकातून बाहेर पडणे आवश्यक आहे. असे न झाल्यास अशा प्रवाशांकडून आता प्रत्येक तासाला १० रुपये ते ५० रुपये एवढा दंड आकारला जाणार आहे. पुणेमेट्रोने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉलपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. पण, आता पुणे मेट्रोने नवीन नियम प्रवाशांच्या माथी मारला आहे. तिकीट काढल्यापासून गंतव्य स्थानकातून बाहेर पडण्यापर्यंतचा प्रवास अवघ्या ९० मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे. अन्यथा मेट्रो अशा ‘लेट’ होणाऱ्या प्रवाशांकडून दंड आकारणार आहे. पुणे मेट्रोने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिकीट खरेदी केल्यानंतर ज्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा आहे, तिथल्या स्थानकातून बाहेर पडण्याचा कालावधी ९० मिनिटांचा आहे. असे न झाल्यास प्रवाशांकडून आता प्रत्येक तासाला दंड आकारला जाणार आहे.
विनातिकीट प्रवास केल्यास ८५ रुपये दंड
मेट्रो स्थानकात तिकीट स्कॅन करूनच प्रवेश मिळतो आणि बाहेर पडण्यासाठीही तिकीट स्कॅन करावे लागते. पण, ज्या स्थानकावर तिकीट काढले आहे, त्या स्थानकापासून ते ज्या स्थानकावर जायचे, त्या स्थानकापर्यंत स्थानकातून बाहेर न पडता कितीही वेळा प्रवास करता येतो. यामुळे मेट्रोचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर आता मेट्रो प्रशासनाने विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विनातिकीट प्रवाशांना आता ८५ रुपये दंड केला जाणार आहे.
नेटकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया
मेट्रो वेळेत आली नाही तर मेट्रो सर्व प्रवाशांना प्रत्येक मिनिटासाठी दंड देणार का, असा सवाल एका प्रवाशाने उपस्थित केला आहे. एका महिला प्रवाशाने रुबी हॉल मेट्रो स्थानकावर बाहेर पडताना मोठी रांग असते. तिथे प्रवाशांचा बराच वेळ जातो, तर त्याबाबत मेट्रो प्रवाशांना भरपाई देईल का, असे विचारले आहे.