ऑक्सिजन प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:57+5:302021-08-12T04:13:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३४ शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३४ शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, त्यातील ५ प्रकल्पांचे काम ‘सार्वजनिक बांधकाम’च्या विद्युत विभागाच्या किरकोळ कामांमुळे रखडले होते. बांधकाम विभागांतर्गत असलेल्या विद्युत विभागाच्या या अधिकाऱ्यांना बोलवून घेत, या प्रकल्पांचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये आठ ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली आहे. तर पाच प्रकल्प उभे राहिले असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागाकडून किरकोळ स्वरूपाची कामे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी ट्रान्सफार्मरची गरज आहे या संदर्भातील कार्यवाही बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यास दिरंगाई झाल्याने हे प्रकल्प रखडले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज या संदर्भात बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन प्रचंड तुटवडा भासला. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील ३४ शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. त्यातील आठ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पाच प्रकल्पांचे काम किरकोळ कामामुळे रखडले होते. यांचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा, सहा प्रकल्पांचे काम ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना दिले आहेत.
------
‘सीएसआर’ निधीतून नऊ प्रकल्प
‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’अंतर्गत (सीएसआर) कंपन्यांनी ९ प्रकल्पांच्या साहित्य खरेदीचे आदेश दिले आहेत. एका प्रकल्पाला जागेची समस्या आहे. ‘सीएसआर’अंतर्गत आणखी ५ प्रकल्प उभारण्याचे कंपन्यांनी मान्य केले आहे. तर, ६ प्रकल्प हे राज्य व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून उभारले जाणार आहेत. मात्र, त्याला अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. मात्र सप्टेंबरमध्ये ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.