एकाच दिवसात रस्त्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:24 AM2018-10-31T03:24:29+5:302018-10-31T03:24:51+5:30
२० वर्षांपासून रखडलेल्या कामाचे भूमिपूजन; ५०० मीटर रस्ता एका दिवसात
कर्वेनगर : कर्वेनगर भागातील पिनाक कॉलनी येथील गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक राजेश बराटे, नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी, भाजपा पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला मेंगडे, विठ्ठल बराटे, दत्तात्रय चौधरी यांच्यासह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर मुक्ता टिळक यांनी तिन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करून पुणे शहराच्या विकासकामांची माहिती नागरिकांना सांगितली. या वेळी नगरसेवक सुशील मेंगडे म्हणाले, ‘‘पिनाक कॉलनीमध्ये रस्ता नसल्याने अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.’’
या कॉलनीला जाणारा रस्ता हा खासगी मालकीचा असल्याने रस्ता विकसित होण्यात मोठी अडचण निर्माण होती. यासाठी आयुक्त व नगर अभियंता यांनी पाहणी करून व महापौरांच्या दालनात जागामालकांना योग्य मोबदला देण्यात येईल, हा निर्णय घेतल्यावर तातडीने हा रस्ता विकसित करण्याच्या कामाला खरी चालना मिळून या रस्त्याच्या डांबरीकरण कामास यश आले. यापुढील काळात आपल्या प्रभागाचा विकास करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, राजेश बराटे व नगरसेविका वृषाली चौधरी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट मिळाली, असे जाहीरपणे सांगितले. हेमंत बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक शिवराम मेंगडे यांनी आभार मानले.
रस्ता नव्हता, तर अनेक अपघात झाले होते. ज्येष्ठांची तर हाडे मोडली होती. रस्ता एकाच दिवसात झाल्यावर लगेचच पथदिवे चालू करण्यात आले आहेत; त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये या वर्षी खरोखरच दिवाळी आली आहे. - समा केळकर
२० वर्षे सगळे नागरिक हतबल झाले होते. शंभर कुटुंबे असूनही रस्ता उपलब्ध होत नव्हता. रस्त्याबरोबर कचरा, लाईट, पाणी याने नागरिक त्रस्त झाले होते. ५०० लोक राहत असून रस्त्यामुळे घरी येण्यास मन तयार होत नव्हते. नगरसेवकांच्या प्रयत्नशील कामामुळे आम्ही समाधानी आहोत.
- प्रकाश महाजन, ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ, महिला आणि विद्यार्थी यांना घरी येताना-जाताना भयंकर त्रास होत होता. पावसाळ्यात तर २ फूट पाय गाडले जात होते. पाण्याची डबकी वाढली होती. किरकोळ अपघात नियमित होत होते. गाड्या रस्त्यावर लावाव्या लागत होत्या. सोनसाखळी चोरी वाढली होती. रस्त्यामुळे सर्व समस्या सुटल्या
- जयंत विराळ, ज्येष्ठ नागरिक