दौंड-पुणे रेल्वेची कामे महिन्यात पूर्ण करा
By admin | Published: May 31, 2017 01:50 AM2017-05-31T01:50:04+5:302017-05-31T01:50:04+5:30
रेल्वे प्रशासनाला समाजहिताची कामे सांगून होणार नसेल तर ही गंभीर बाब आहे. जर महिनाभरात पुणे आणि दौंड परिसरात
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : रेल्वे प्रशासनाला समाजहिताची कामे सांगून होणार नसेल तर ही गंभीर बाब आहे. जर महिनाभरात पुणे आणि दौंड परिसरात सुचवलेली कामे झाली नाही तर ३ जुलै रोजी पुणे रेल्वे स्थानकात, तर ४ जुलै रोजी दौंड रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत दिला. समाजहिताच्या विकासकामांसाठी रेल्वे प्रशासनाचा आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसत आहे. जर तुमच्याकडून कामे होत नसेल तर राजीनामा देऊन चालते व्हा, असा संतप्त प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. मी आंदोलन करेल तेव्हा रेल रोको करणार नाही.
कारण रेल रोको केल्यास प्रवाशांना विनाकारण वेठीस धरल्यासारखे होईल. याउलट मी रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करेल. तेव्हा रेल्वे स्टेशन सोडून मी बाहेर जाणार नाहीच; परंतु रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे स्थानकाबाहेर जाऊ देणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मवाळ राहून चालणार नाही तर आक्रमक होणे या पलीकडे आता माझ्याकडे काही उरले नाही, असे सुळे म्हणाल्या.
रेल्वेचे सांडपाणी, अंतर्गत रस्ते, डेमू लोकलची प्रवाशांना होणारी गैरसोय, रेल्वे प्रवासी गाड्यातील जुगार, या प्रश्नांवर रेल्वे अधिकाऱ्यांना सुळे यांनी धारेवर धरले. या बैठकीला माजी आमदार रमेश थोरात, सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, अप्पासाहेब पवार, राणी शेळके, हेमलता परदेशी, वीरधवल जगदाळे, सोहेल खान, प्रवीण शिंदे, योगिनी दिवेकर यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क जुगारी प्रवाशांवर कारवाई करणार
दौंड रेल्वे स्थानकातून दररोज सकाळी ७ वाजता डेमूऐवजी पूर्वीची शटल गाडी सोडली जाईल तसेच या शटलला शेवटच्या दोन बोग्या महिलांसाठी राखीव राहतील. याव्यतिरिक्त पुन्हा दोन डबे कसे लावता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल. रेल्वेत जुगार खेळतात अशा प्रवाशांवर कडक कारवाई केली जाईल.
- सुरेश जैन,
रेल्वे सहायक मंडल परिचालन प्रबंधक
संबंधितांवर गुन्हे दाखल करा
रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आलेल्या निधीपैकी दीड कोटी रुपयांचा निधी कुरकुंभ मोरीसाठी न वापरता तो अनधिकृतपणे इतर कामासाठी वापरला, असे नगरसेवक गौतम साळवे यांनी सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा सुळे म्हणाल्या, की ५ कोटींचा बाऊ केल्यामुळे कुरकुंभ मोरीचे काम रखडले. जर कुरकुंभ मोरीचा दीड कोटी निधी इतरत्र कामासाठी वापरला असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे सुळे यांनी सांगून त्यांनी याकामी रीतसर चौकशी करण्याच्या सूचना मुख्याधिकारी विजय कुमार थोरात यांना दिल्या, तसेच मी स्वत: जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करते, असे सुळे यांनी सांगितले.