भूमिगत गटाराचे काम पूर्ण करून शाळेशेजारी सोडलेले सांडपाणी हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:55+5:302021-03-24T04:11:55+5:30
-- नीरा : गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परिसरात सोडलेले सांडपाणी हटवावे तसेच भूमिगत गटाराचे काम लवकर ...
--
नीरा : गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परिसरात सोडलेले सांडपाणी हटवावे तसेच भूमिगत गटाराचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश पुरंदरच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने गुळुंचे ग्रामपंचायतीला दिले आहेत. गटारांचे काम पूर्ण करण्यास कसूर करत असलेल्या ग्रामपंचायतीला हा निकाल दे धक्का ठरला आहे.
गावातील जुनी बारव परिसरात तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या नजीक मैला व सांडपाणी उघड्यावर सोडलेले होते. तसेच गावात उघड्या गटारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा समस्या निर्माण होत होत्या. नागरिक व शाळेतील विद्यार्थी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने याची वेळीच दखल घेऊन सांडपाणी व मैला पाणी हटविण्यात यावा तसेच गटार यंत्रणा भूमिगत करावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी सासवड येथे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३३ प्रमाणे याचिका दाखल केली होती.
निकाल निगडे यांच्या बाजूने लागला असून उघड्यावर मैला व सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायतीला ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, येथील गायरान जागेत गटार यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी परवानगी लागणार असून शाळांच्या भोवती संरक्षक भिंत असल्याने मुलांना त्रास होत नसल्याचे म्हणणे ग्रामपंचायतने सादर केले होते. मात्र, निगडे यांनी सर्व आवश्यक पुरावे सादर केल्याने उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी निकाल निगडे यांच्या बाजूने दिला आहे. येथील केवळ गायरान नव्हे तर गावठाण जागेतही उघड्यावर गटार व मैला पाणी सोडण्यात आला आहे. गटार यंत्रणा करण्यासाठी सर्वच ठिकाणी परवानगीची आवश्यकता नाही. गायरान जागेत घरकुल दिले जात असताना गटार यंत्रणेला मात्र परवानगी मागितली जात असल्याने या अजब कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या निकालाने ग्रामपंचायतला आता लवकरात लवकर सांडपाणी उघड्यावर सोडणे बंद करावे लागणार असून भूमिगत गटार यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे.
--
कोट
अखेर सत्याचा विजय झाला असून आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असलेले सांडपाणी बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर आपोआप गुन्हे दाखल होणार आहेत.
- अक्षय निगडे, उपाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस.