पुणे मेट्रोसाठी संपादीत ३९३ प्रॉपर्टीजचे सर्व्हेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:20 PM2018-06-30T13:20:31+5:302018-06-30T13:31:04+5:30
मेट्रो मार्गात बाधित होणाऱ्या ६८८ प्रॉपर्टीत घरांसोबतच दुकानेही समाविष्ट आहेत. त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम महामेट्रोतर्फे सुरू करण्यात आले आहे.
पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी महामेट्रोच्या वतीने शहरातील सुमारे ६८८ प्रॉपर्टीज संपादीत करण्यात येणार आहे. यापैकी ३९३ प्रॉपर्टीच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहेत. शिल्लक प्रॉपर्टीचे देखील सर्व्हेक्षण लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मेट्रो प्रकल्प प्रमुख गौतम बिऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मेट्रो मार्गात बाधित होणाऱ्या ६८८ प्रॉपर्टीत घरांसोबतच दुकानेही समाविष्ट आहेत. त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम महामेट्रोतर्फे सुरू करण्यात आले आहे. प्रॉपर्टी मालकांसोबत भेटून भू - संपादन संदर्भात चर्चा करण्यात येते. मेट्रोच्या वेळेत हे काम होते. यादरम्यान काही घरे आणि दुकानांना कुलूप असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ६८८ प्रॉपटीर्पैकी केवळ ३९३ प्रॉपर्टीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. परंतु, आता नव्याने सर्व्हेक्षण सायंकाळी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच प्रॉपर्ट्यांचे सर्व्हेक्षण करणे सोपे होण्यास मदत होईल. तसेच जलद गतीने भू-संपादन देखील करता येणार आहे. पुणे मेट्रोतील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. वनाज ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्टपर्यंत काम सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत ७८ पिलर्स उभारण्यात आले आहेत. ७३ पिलर्सच्या पाईलचे काम पूर्ण झाले. १८ पिलर्स आणि ४५ पिलर्सचे अर्धे काम पूर्ण झाले. दोन जागी स्पॅनचे काम पूर्ण झाले. तर, एका जागी आणखी जोमाने काम सुरू आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गावर आणि कास्टिंग यार्डमध्ये तब्बल ३ हजार कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत.