पुण्यातील मंडळांकडून गणेशमूर्तीबाबत पुरेपूर दक्षता

By Admin | Published: July 9, 2015 03:10 AM2015-07-09T03:10:14+5:302015-07-09T03:10:14+5:30

मंडळांच्या मंदिरांची, मूर्तींची पाहणी केली असता मूर्तीवर मोजकेच दागिने ठेवून अन्य दागिने लॉकरमध्ये ठेवण्याची खबरदारी मंडळांनी घेतल्याचे दिसून आले.

Complex efficiency of Ganesh idols from Pune Circle | पुण्यातील मंडळांकडून गणेशमूर्तीबाबत पुरेपूर दक्षता

पुण्यातील मंडळांकडून गणेशमूर्तीबाबत पुरेपूर दक्षता

googlenewsNext

पुणे : मानाच्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेश मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्याने डाव साधल्यानंतर मध्यवर्ती भागातील काही मंडळांच्या मंदिरांची, मूर्तींची पाहणी केली असता मूर्तीवर मोजकेच दागिने ठेवून अन्य दागिने लॉकरमध्ये ठेवण्याची खबरदारी मंडळांनी घेतल्याचे दिसून आले.
हत्ती गणपती, भाऊ रंगारी गणपती, विश्रामबाग मित्र मंडळ, राजाराम मंडळ, नागनाथ पार गणेशोत्सव मंडळ, बाबू गेनू मंडळ, चिमण्या गणपती आदी मंडळांच्या गणेशमूर्तींची, मंदिरांची व सुरक्षाव्यवस्थेची पाहणी लोकमत चमूने केली.
मानाच्या तुळशीबाग मंडळाच्या ‘श्रीं’ना चांदीचे दागिने आहेत. या मंडळाचे विवेक खटावकर म्हणाले, ‘‘रात्रभर सुरक्षारक्षक असतो. दिवसभर विक्रेते असतात. त्यामुळे सुरक्षा निर्माण झाली आहे. मध्यंतरी काही प्रकार झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.’’ मानाच्या गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी म्हणाले, ‘‘आमच्या ‘श्रीं’ना उत्सव काळात १० दिवस दागिने असतात. विसर्जन झाले, की सेफ लॉकरमध्ये दागिने ठेवतो.’’
जिलब्या गणपती मंडळाचे प्रसिद्धिप्रमुख मकरंद माणसीकर म्हणाले, ‘‘देवाच्या अंगावर फक्त चांदीचा हार असतो. बाकीचे दागिने लॉकरमध्ये असतात. मंदिराला आतून लोखंडी शटर व बाहेरून बुलेटप्रूफ काच असल्याने सुरक्षा आहे.

त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंदिर, कसबा पेठ
सुरक्षिततेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. गणपतीच्या अंगावरील सोने हे फक्त गणेश जयंती व गणेशोत्सवालाच मूर्तीवर चढवले जातात. उत्सवांच्या वेळी २४ तास मूर्तीच्या जवळ कार्यकर्ते असतात. - हृषीकेश घोडके, अध्यक्ष

गावकोस मारुती संस्था गणेश मंडळ, कसबा पेठ
मूर्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले असतात. गणेशोत्सवातच ते गणपतीच्या अंगावर घातले जातात. त्यामुळे सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे काहीच कारण नाही. मंदिरामध्ये फक्त मूर्ती असते. - दत्तात्रय नलावडे, अध्यक्ष

जनार्दन पवळे संघ मित्र मंडळ, कसबा पेठ
आमची दोन मंदिरे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचा फायदा असा, की काही महिन्यांपूर्वी मंदिराच्या शेजारील दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरालाही आम्ही पकडून दिले होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहिजे. आमचे कार्यकर्ते पहाटेपर्यंत मंदिरात बसलेले असतात. - दिनेश डाखवे, अध्यक्ष

श्रीमंत पेशवे गणेश मंडळ, कसबा पेठ
तीन वर्षांपूर्वी या मंदिरातील दानपेटी फोडली होती; पण आता तेथे आठ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या अंगावरील सर्व दागिने रोज संध्याकाळी काढून सुरक्षित ठेवले जातात. लोखंडी जाळीचा दरवाजा असल्यामुळे चोरी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सदस्य चंद्रकांत जोशी यांनी दिली. - गिरीश बापट, अध्यक्ष

Web Title: Complex efficiency of Ganesh idols from Pune Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.