वातावरणातूनच खेचला जात असला तरी वैद्यकीय ऑक्सिजन तयार करणे क्लिष्ट प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:51+5:302021-04-24T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : वातावरणातील ऑक्सिजन खेचूनच वैद्यकीय उपयाेगासाठी वापरला जात असला तरी ताे तयार करण्याची प्रक्रिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वातावरणातील ऑक्सिजन खेचूनच वैद्यकीय उपयाेगासाठी वापरला जात असला तरी ताे तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असते. त्यामुळे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने उभारणे जिकिरीचे आहे. वातावरणातील हवा खेचून त्यातून ऑक्सिजन वेगळा काढून तो वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. अत्यंत गुंतागुंतीची जोखमीची प्रक्रिया त्यासाठी वापरली जाते.
ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारी बहुतांश उपकरणे आयात करावी लागतात. अशी यंत्रणा हाताळण्यासाठी निष्णात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.
—-
——-
कसा बनवितात वैद्यकीय ऑक्सिजन
वैद्यकीय कारणासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन द्रव स्वरूपात साठविला जातो. यंत्राद्वारे वातावरणातील हवा खेचली जाते. त्यानंतर हवा तीनदा शुद्ध केली जाते. धूलिकण आणि इतर अशुद्ध भाग काढला जातो. कार्बनडाय ऑक्साईड वायू वातावरणात पुन्हा सोडला जातो. केवळ नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑरगॉन हे तीन वायू साठविले जातात. उद्योगांमध्ये या तिन्ही वायूंची आवश्यकता असते. ऑक्सिजन द्रव स्वरूपात आणण्यासाठी उणे १८० डिग्री तापमान संतुलित ठेवावे लागते. यासाठी उच्चदाब प्रक्रिया अवलंबली जाते. असा ऑक्सिजन इस्पितळात सिलिंडरद्वारे अथवा मोठ्या टँकद्वारे पुरविला जातो. गॅस सुरू केल्यानंतर द्रव ऑक्सिजन वायू स्वरूपात बाहेर येतो.
—-
काय आहे आव्हान
एखाद्या प्रकल्पाची क्षमता शंभर टन असेल तर त्याची साठवणूक क्षमता तीनशे टन असते. तिन्ही वायूचा दाब नियंत्रित करावा लागतो. हा दाब नियंत्रित करणे आवश्यक असते अन्यथा टाकी फुटून प्रकल्पालाही धोका पोहचू शकतो. कारखान्यातील टँकमधून गाडीत ऑक्सिजन भरणे आणि गाडीतून तो खाली करणे हे काम जिकिरीचे असते. त्यासाठी चालकही प्रशिक्षित असावा लागतो. प्रकल्प हाताळण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञ आवश्यक असतो.
—-
म्हणून ऑक्सिजन वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर
ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी यासाठी क्रायाेजेनिक कंटेनर लागतात. संपूर्ण भारतात सुमारे १२०० क्रायाेजेनिक कंटेनर आहेत. टाटा कंपनीने २४ कंटेनर तातडीने आयात करणार असल्याचे सांगितले आहे. एक सिलिंडरमागे एक रिकामा सिलिंडर असे प्रमाण राखावे लागते. मागणी वाढल्याने आता सिलिंडरचे प्रमाण एकास तीन असे वाढविले आहे. ऑक्सिजन वाहनांच्या फेऱ्या वाढल्याने त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात येत आहे.
बहुतांश प्रकल्पांसाठी द्रवरूप ऑक्सिजन आवश्यक
ऑक्सिजन निर्मितीसाठी दोन प्रकारचे प्रकल्प असतात. एका प्रकल्पात द्रव रूपातील ऑक्सिजन वायूरूपात आणून मेडिकल वापराच्या सिलिंडरमधून पुरवठा करणे. सध्या राज्यात याच प्रकारचे प्रकल्प आहेत. दुसऱ्या प्रकल्पात हवेतील ऑक्सिजन शोषून सिलिंडरमधून पुरवठा करणे. हा प्रकल्प मोठा खर्चीक आणि प्रक्रिया किचकट असल्याने असे प्रकल्प कमी प्रमाणात आहेत. सध्या द्रव ऑक्सिजन मिळत नसल्याने आम्ही देखील हतबल असल्याचे दाैंड तालुक्यातील गुरुदत्त इंटरप्रायजेसचे चालक अविनाथ खेडेकर यांनी सांगितले.
तांत्रिक मनुष्यबळ हाच सर्वात माेठा प्रश्न
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावर अनेक कंपन्यांनी वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन तयार करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, तांत्रिक मनुष्यबळ हा सर्वात माेठा प्रश्न आहे. जेजुरी आणि लोणंद येथील कंपन्यांनी त्यांच्या प्रकल्पासाठीचा ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यात काही तांत्रिक बदल करावे लागतील, असे उद्याेग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.
गरज दहा पटीने वाढल्याने निर्माण झाला प्रश्न
ऑक्सिजनच्या एकूण उत्पादनाच्या ८० टक्के वापर हा औद्योगिक कारणासाठी होतो. आतापर्यंत ऑक्सिजनची गरज मर्यादित हाेती. परंतु, गेल्या काही दिवसांत ही गरज दहा पटीने वाढली आहे. सध्या राज्याची गरज ही १५०० टन आहे. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून १२०० टनापर्यंत आणण्यात आले आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरात ऑक्सिजनचे मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कारणांमुळे प्रकल्पीय क्षमतेनुसार ऑक्सिजन करता येतो. काही कारखाने गॅस स्वरूपात ऑक्सिजन करतात तेथे द्रव स्वरूपात ऑक्सिजन करण्याची यंत्रणा उभारावी लागेल.
सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक
साखर कारखान्यांना तातडीने प्रकल्प उभारणे अवघडच
साखर कारखान्यांनी ऑक्सिजनचे उत्पादन करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. मात्र, कारखान्यांकडे वैद्यकीय ऑक्सिजन तयार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाही, असे कारखान्यांतून सांगण्यात आले आहे.