एक वर्षाच्या तन्वीचं आयुष्य होणार सुखकर; आर्थिक मदतीने हृदय शस्रक्रियेचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 04:20 PM2021-05-27T16:20:49+5:302021-05-27T17:58:29+5:30

काही दिवसांपूर्वी वय वर्ष अवघे एक असलेल्या तन्वीच्या हृदयातील गुंतागुंत समोर आली आणि चव्हाण कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला...

Complicated heart surgery on one year Tanvi ; Financial support for treatment through social commitment | एक वर्षाच्या तन्वीचं आयुष्य होणार सुखकर; आर्थिक मदतीने हृदय शस्रक्रियेचा मार्ग मोकळा

एक वर्षाच्या तन्वीचं आयुष्य होणार सुखकर; आर्थिक मदतीने हृदय शस्रक्रियेचा मार्ग मोकळा

Next

पुणे : नियती कधीच गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही. तिच्या तडाख्यात सापडणाऱ्यांच्या दोनच मार्ग असतात. त्यातला एक म्हणजे आलेल्या संकटाला सामोरे जाणे आणि दुसरं म्हणजे आहे त्या परिस्थितीत मनाचा खंबीरपणा टिकवत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे. पुण्यातील सागर चव्हाण यांच्याबाबतीत देखील असाच प्रकार घडला आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर काही दिवसांपूर्वी अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वय वर्ष अवघे एक असलेल्या तन्वी नावाच्या मुलीच्या हृदयातील गुंतागुंत समोर आली आणि चव्हाण कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण 'माणुसकी' मदतीला धावून अन् संकटावर मात करण्यासाठी दिशा मिळाली आहे. 

पुण्यातील निलायम चित्रपट गृहाजवळील आंबेडकर वसाहतीत आठ बाय आठ चौरस फुटाच्या झोपडीत राहणारे हे चव्हाण कुटुंब. वैकुंठात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या सागर यांना एकूण तीन मुली. त्यातली तन्वी ही सर्वात धाकटी. तिच्या हृदयाला तीनच कप्पे आहेत. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होऊन तेच रक्त फुफ्फुसात आणि पुढे शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. त्यामुळे तिच्या शरीरात अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार होत असून भविष्यात गुंतागुंत वाढण्यापेक्षा तन्वीवर वेळीच शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.तसेच या शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपये खर्च अपेक्षित होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने चव्हाण कुटुंबासमोर एकीकडे तन्वीचं आयुष्य तर दुसरीकडे साडे चार लाख रुपये कसे उभे करायचे हा यक्ष प्रश्न होता.कारण घरात सागर हे एकटेच कमावते होते. 

यावेळी तन्वीच्या उपचारासाठी तिच्या नातेवाईकांनी साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्कम निधी कशा पद्धतीने जमा करता येईल यांचा अंदाज घेणे सुरु केले. याबाबत चाकण येथील त्यांच्या ऑटर कंट्रोल्स प्रा. लि. कंपनीच्या उल्हास जोशी यांना तन्वीच्या शस्त्रक्रियेसंबंधीची माहिती दिली असता त्यांनी साडेतीन लाख रुपयांची मदत घाटे यांच्याकडे दिली. 

याबाबत नगरसेवक धीरज घाटे म्हणाले, तन्वीची आई निशा ही लग्नापूर्वी साने गुरुजी नगरात राहत होती. तन्वीचा मामा विजय आणि मामी प्रज्ञा मोरे यांनी या संदर्भात माझ्याशी संपर्क साधला. साने गुरुजी तरुण मंडळ म्हणून आपल्याला काही करता येईल का, अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, शस्त्रक्रियेसाठी आता पुरेशी रक्कम जमा झाल्यामुळे आता तन्वीच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जहांगीर हॉस्पिटल येथील डॉ. राजेश कौशिश हे तन्वीवर शस्त्रक्रिया करणार आहेत. साधारण चार ते पाच तास ही शस्त्रक्रिया चालणार असून, त्यानंतर आठ त दहा दिवस तन्वीला हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर तन्वी पूर्णपणे ठणठणीत बरी होईल आणि निरोगी तसेच स्वस्थ जीवन जगू लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तन्वीची आयुष्यासाठी लढाई सुरू आहे. यात काहीतरी योगदान देता आले याचे समाधान आहे असेही घाटे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Complicated heart surgery on one year Tanvi ; Financial support for treatment through social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.