संगतकाराने स्वत:ला कलेच्या चौकटीत बसविणे गरजेचे : विजय घाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:55 PM2018-03-30T14:55:09+5:302018-03-30T14:55:09+5:30

पं. उमेश मोघे यांनी पं.विजय घाटे यांच्याशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाव्दारे रसिकांना एका उमद्या कलाकाराच्या जडणघडणीची सुरेल कथा ऐकायला मिळाली.

The composer should put himself in the frame of art : Vijay Ghate | संगतकाराने स्वत:ला कलेच्या चौकटीत बसविणे गरजेचे : विजय घाटे

संगतकाराने स्वत:ला कलेच्या चौकटीत बसविणे गरजेचे : विजय घाटे

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक दिग्गजांचा सहवास लाभला हे माझे भाग्य

पुणे  : तबलावादन हे एकल असते. पण मुख्यत: हे वाद्य साथसंगत करण्यासाठी वापरले जाते. गायन, नृत्य, बासरी, सतार, संतूर अशा कोणत्याही वाद्याबरोबर तबल्याची साथ देताना मुख्य कलाकाराच्या विचारांशी आपले वादन एकरुप झाले पाहिजे. त्या कलाकाराच्या गायन, नृत्य किंवा वादनावर हावी न होता त्याच्या साथीदाराचीच भूमिका पार पाडली पाहिजे. सगळ्या घराण्यांचा अभ्यास करून साथसंगत करत असताना वैविधघ्यपूर्ण घराण्यांच्या चौकटीत स्वत:ला आणि स्वत:च्या कलेला बसविणे गरजेचे असते. तरच आपण विविध घराण्यातील गायक, वादक आणि नर्तकांना उत्तम साथसंगत करू शकतो, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. विजय घाटे यांनी मैफलीमधील‘संगतकारा’चे महत्व अधोरेखित केले. 
भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘तालसंवाद’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी घाटे यांनी उपस्थितांसमोर साथसंगतीचे रहस्य उलगडले. दाबके ट्रस्ट,पुणे प्रस्तुत या कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पं.विजय घाटे यांच्या कारकिर्दीचा सांगीतिक मागोवा घेण्यात आला.  पं. उमेश मोघे यांनी घाटे यांच्याशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाव्दारे रसिकांना एका उमद्या कलाकाराच्या जडणघडणीची सुरेल कथा ऐकायला मिळाली. यावेळी भारतीय विद्याभवनचे संचालक आणि मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. तबलावादनाच्या निमित्ताने मला अनेक दिग्गजांचा सहवास लाभला हे माझे भाग्यच समजतो. या थोरा-मोठ्यांच्या संगतीत त्यांची संगीताची भाषा मला आत्मसात करता आली. ती भाषा माझ्यात झिरपत गेली आणि त्याविषयीच्या मनन-चिंतनातून मी माझे वादन समृद्ध करीत गेलो. संगीत क्षेत्रातील या दिग्गजांमुळे माझे वादन अधिक सकस होण्यास मोठा हातभार लागला. घाटे पुढे म्हणाले,मनोरंजन आणि अभ्यास म्हणून तबला वादन ऐकणे यात फरक आहे. अभ्यास म्हणून तबलावादनाची साधना करत असताना तुमच्या आवडत्या आणि आदर्श कलाकाराचे वादन खूप वेळा ऐकणे आणि अभ्यासू वृत्तीने ऐकणे गरजेचे असते.यावेळी  पं. विजय घाटे यांनी तबलावादनाच्या काही प्रात्यक्षिकांव्दारे दिलेल्या कलानुभूतीला रसिकांनी भरभरून दाद  दिली. त्यांना अभिषेक शिनकर यांनी हार्मोनियमवर  साथसंगत केली. 

Web Title: The composer should put himself in the frame of art : Vijay Ghate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.