एमपीएससी परीक्षा मर्यादेच्या निर्णयावर विद्यार्थ्यांची संमिश्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:11+5:302021-01-08T04:34:11+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांसाठी आता कमाल मर्यादा निश्चित केल्या आहेत. या निर्णयावर काही विद्यार्थ्यांनी नाराजी ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांसाठी आता कमाल मर्यादा निश्चित केल्या आहेत. या निर्णयावर काही विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शीविली आहे. तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे या निर्णयावर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थी कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात. यापूर्वी सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा कितीही वेळा देता येऊ शकत होती. आता एमपीएससीच्या निर्णयाने २०२१च्या जाहिरातीनुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी हा नियम लागू होणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याबाबत सीमा रेषा आखली जाईल. त्यामुळे परीक्षेचे गांभीर्य वाढणार आहे. मात्र एमपीएससीने वेळेवर परीक्षा घेतल्या नाहीत, जागांचे प्रमाण वाढविले नाही. तर या निर्णयाचा तोटा विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी, आयोगाच्या रिक्त सदस्यांची भरती, रखडलेले निकाल, मुलाखती, मैदानी चाचणी याकडे लक्ष देण्याची गरज असून तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या १० वर्षांत ५५,१३३ एवढ्या जागा भरल्या. त्यासाठी एकूण एक कोटी अकरा लाख अर्ज केलेले होते. त्यामुळे या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांनी व पालकांनी या निर्णयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी तिशी पार केलेली आहे. असे विद्यार्थी सततच्या अपयशाने, नैराश्याने, व्यसनाधीनतेने ग्रासले आहेत. यामुळे त्यांचे पालकदेखील चिंताग्रस्त असून या विद्यार्थ्यांसमोर सामाजिक प्रश्न त्या सोबतच नोकरीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे या निर्णयाने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळू शकते. तसेच त्याला दुसऱ्या पर्यायाचा निर्णय घेण्यासाठी विचार करता येईल, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
कोट
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आता या नियमानुसार परीक्षा देताना गांभीर्य वाढणार असून ‘स्व’ला ओळखण्याची संधी निर्माण होईल.
- राहुल सोनटक्के, विद्यार्थी
विद्यार्थी जास्त वेळ अडकून पडू नये यासाठी हा निर्णय असेल तर स्वागत आहे. परंतु या निर्णयाचा फक्त खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. मात्र इतर प्रवर्गातील विद्यार्थी वर्षानुवर्षे अडकून पडतील. इतर प्रवर्गातील बेकारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाटते.
- सुजित जाधव, विद्यार्थी
एमपीएससीने असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना धक्का दिला आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत. मात्र असे निर्णय घेतले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, सामाजिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. या निर्णयाचा फेरविचार करावा.
- स्वप्नाली काकडे, विद्यार्थिनी
मुलगी असल्याने घरातून परीक्षा देण्यासाठी मर्यादा आहेत. ६ ते ९ वेळा संधी दिली तरी एकूण लागणाऱ्या निवड प्रक्रियेला साधारणपणे वर्ष ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. केंद्रीय लोकसेवा आयोग ज्या प्रमाणात जागा काढते. त्या धर्तीवर एमपीएससीने जागा काढाव्यात, तरच या निर्णयाचा फायदा होऊ शकेल.
- पूजा निकम, विद्यार्थिनी
* चौकट मध्ये बदल करू नये असे सुचना आहे.
* (अशाप्रकारे होईल संधीची गणना )