‘समग्र प्रेमानंद गज्वी’ खंडात्मक ग्रंथाची निर्मिती, ९९व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात होणार प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:08 AM2019-02-08T02:08:51+5:302019-02-08T02:09:04+5:30
कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अडकून न पडता ज्ञानासाठी कला याचे आत्मभान साहित्यविश्वाला देणारी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा म्हणजे वाचकांसाठी संग्रही ठेवावा असा एक अमूल्य ठेवा.
- नम्रता फडणीस
पुणे - कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादात अडकून न पडता ज्ञानासाठी कला याचे आत्मभान साहित्यविश्वाला देणारी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा म्हणजे वाचकांसाठी संग्रही ठेवावा असा एक अमूल्य ठेवा. मात्र गज्वी यांची ही साहित्यसंपदा सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळे वाचकांना त्यापासून वंचित राहावे लागते. हीच गरज लक्षात घेऊन नागपूर येथील विजय प्रकाशनने नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या नाटकांचा समावेश असलेल्या ‘समग्र प्रेमानंद गज्वी’ या पहिल्या खंडाची निर्मिती केली आहे.
एखाद्या नाटककाराच्या साहित्यकृतींवर प्रथमच अशाप्रकारे समग्र खंड साकारला जात आहे. या खंडामध्ये गज्वीप्रेमींना त्यांची गाजलेली सात नाटके वाचायला मिळणार आहेत. येत्या २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये या पहिल्या खंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
समाजातील देवदासींचा प्रश्न असो अथवा जातीय गुंत्यामधून निर्माण झालेली समाजव्यवस्था असो अशा सगळ्या प्रश्नांचा आपल्या टोकदार लेखणीतून वेध घेणाºया प्रेमानंद गज्वी यांच्या नाटकांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतलाआहे.
त्यांची नाटके कालातीत असल्यामुळेच केवळ मराठी नव्हे तर हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली, छत्तीसगढी, मल्याळी आदी भारतीय भाषांमध्ये त्यांची नाटके अनुवादित झाली असून, त्याचे प्रयोगही काही निवडक भाषांमध्ये झाले आहेत.
तीन खंडांतून समोर आणणार
मराठी साहित्यविश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया या आधुनिक नाटककाराची ग्रंथसंपदा वाचकांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. यासाठी विजय प्रकाशनाने प्रेमानंद गज्वी यांची ग्रंथसंपदा तीन खंडांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणण्याचे ठरविले आहे.
पहिला खंड नाटकांवर आधारित असून, यामध्ये गज्वी यांच्या ‘देवनवरी’, ‘किरवंत’, ‘तनमाजोरी’, ‘पांढरा बुधवार’, ’वांझ माती’, ‘जय जय समर्थ’ आणि ‘गांधी आंबेडकर’ या सात नाटकांचा समावेश असल्याची माहिती विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गज्वी हे नाटककार म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी कथा, कादंबºया आणि काव्यलेखनही केले आहे. त्यामुळे दुसरा खंड एकांकिका आणि तिसरा खंड कथा, कादंबºया यावर आधारित असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.