ठेकेदारांसोबत पीएमपी आगारप्रमुखांचे साटेलोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:18 PM2018-11-01T20:18:23+5:302018-11-01T20:33:04+5:30
ठेकेदारांकडून दररोज अधिकाधिक किलोमीटर अंतरापर्यंत बस धावण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेवढे जास्त किलोमीटर तेवढे जास्त पैसे, हे यामागचे गणित आहे.
पुणे : काही आगारामध्ये कर्मचाऱ्यांना आरामदायी कामे देण्यासाठी ‘रेट कार्ड’ असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. आता त्यामध्ये काही आगारप्रमुखांचे ठेकेदारांशी साटेलोटे असल्याच्या आरोपाची भर पडली आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या मालकीच्या बसला डावलून ठेकेदारांकडील बसला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप काही चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
पीएमपीच्या मालकीच्या बसेसची संख्या अपुरी असल्याने ठेकेदारांमार्फत काही मार्गांवर बस संचलन केले जाते. प्रामुख्याने बीआरटी मार्गावर ठेकेदारांकडील बस सोडल्या जातात. सुमारे ६५३ बस ठेकेदारांच्या असून त्यापैकी ४५० च्या जवळपास बस मार्गावर असतात. तर पीएमपीच्या ताफ्यातील एक हजार ते अकराशे बस धावतात. त्यातील सुमारे १५० बसचे दररोज ब्रेकडाऊन होते. त्यामुळे सध्या मार्गावर अधिकाधिक बस सोडण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. बसचे वेळापत्रक निश्चित असून त्यानुसार बससह चालक व वाहकांच्या कामाचे नियोजन केले जाते. आगारप्रमुख व टाईमकिपरवर त्याची जबाबदारी असते. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बस संचलनामध्ये पीएमपीच्या मालकीच्या बसला पहिले प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू करण्यात आली होती. तसेच चालकांना एक बस व एक मार्ग किमान तीन महिन्यांसाठी दिला जातो, असे एका चालकाने सांगितले.
एखाद्या लांबपल्याच्या मार्गावर पीएमपीच्या मालकीची बस असल्यास अचानक काही आगारप्रमुखांकडून या मार्गावर ठेकेदारांची बस सोडली जाते. सध्या ठेकेदारांना प्रत्येक किलोमीटरसाठीसुमारे ५४ रुपये दिले जातात. काही दिवसांपुर्वी हा दर सुमारे ५६ रुपये एवढा होता.दररोज बस जेवढी किलोमीटर धावेल, त्याप्रमाणे त्यांना पैसे दिले जातात. त्यामुळे ठेकेदारांकडून दररोज अधिकाधिक किलोमीटर अंतरापर्यंत बस धावण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेवढे जास्त किलोमीटर तेवढे जास्त पैसे, हे यामागचे गणित आहे. त्यासाठी लांब पल्ल्याचे मार्ग फायदेशीर ठरतात. या मार्गांसाठी काही आगारप्रमुख व ठेकेदारांमध्ये आर्थिक समझोता होतो. काही आगारप्रमुखांकडून ठेकेदारांच्या बसला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप चालकांनी केला आहे.
-----------
एका चालकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘चालकांना संबंधित मार्गावर किमान तीन महिन्यांसाठी फिक्स ड्युटी दिली जाते. तक्रारी आल्यासच हा मार्ग बदलला जातो. पण काही संबंधित आगारप्रमुखाने कोणतेही कारण न देता मार्ग बदलला. हा मार्ग ठेकेदाराकडील बसला देण्यात आला. याबाबत विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली आहे.’मार्गात बदल करण्यावरून चालक व आगारप्रमुखांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. असाच वाद झालेल्या एका चालकाने सांगितले की, आगारप्रमुखांनी अचानक मार्ग बदलल्याने त्यांच्याशी वादही झाला होता. हा वाद मारहाणीपर्यंत गेला असता. पण त्यांनी चुक मान्य केल्याने पुढील वाद टळला. अनेकदा ठेकेदारांच्या बसला लांब पल्याचे मार्ग दिले जातात. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होते.