स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिका कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 09:15 PM2019-01-18T21:15:51+5:302019-01-18T21:20:29+5:30
स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याच १७ हजार कर्मचाऱ्यांमागे दंडूका उगारला आहे.
पुणे : स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याच १७ हजार कर्मचाऱ्यांमागे दंडूका उगारला आहे. हा अभिप्राय नोंदविणे बंधनकारक करण्यात आले असून अभिप्राय न नोंदविल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेमध्ये यंदा पहिल्या क्रमांकाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी आसुसलेले आहेत. त्यासाठी वारंवार नागरिकांना आवाहन केले जात आहे. मात्र, सध्या शहरातील ‘स्वच्छते’ची अवस्था, अतिक्रमणे, रस्त्यांची अवस्था, जागोजाग सुरु असलेली कामे, धूळ यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नागरिकांचा अपेक्षित सहभाग मिळत नसल्याने अधिकाधिक गुण कसे मिळणार असा प्रश्न प्रशासनाला पडलेला आहे. त्यामुळे हक्काच्या १७ हजार कर्मचा स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभिप्रायासाठी पालिक कर्मचाऱ्यांना अरे‘रावी’ना ऑनलाईन अभिप्राय नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राहण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये देश पातळीवर अग्रगण्य ठरलेल्या पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात मात्र उत्तम कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धेच्या निकषानुसार, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सकारात्मक अभिप्राय नोंदविणे गरजेचे आहे. परंतु, ‘चाणाक्ष’ पुणेकरांनी पालिका प्रशासनाला प्रतिसादामधूनच आपले मत व्यक्त केले आहे. आॅनलाईन अभिप्रायांची अपेक्षित संख्या गाठता न आल्याने पालिकेच्या कर्मचाºयांना हा अभिप्राय नोंदविण्यासाठी सक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचाºयांनी अभिप्राय नोंदविल्यानंतर त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक याचा अहवाल १९ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सुचनाही क्षेत्रीय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. या अहवालात जे कर्मचारी अभिप्राय न नोंदविलेले आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रकामध्ये म्हटले आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर लावला असून अभिप्राय देणे अथवा न देणे हा वैयक्तिक मुद्दा आहे. थेट निलंबनाची धमकी देऊन प्रशासन दबावतंत्राचा वापर करीत असल्याची टीका कर्मचारी करु लागले आहेत.
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच क्षेत्रीय कार्यालयांकडून जनजागृती करण्यात आली आहे. स्वच्छताविषयक फलक, बसथांबे, भिंतींवर लावण्यात आले आहेत. रस्त्यांवरील भिंती, पुलांच्या भिंती, कठडे रंगविण्यात आले आहेत. घनकचरा विभागाने ८० हजार चौरस फूट तर १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ५ लाख ४० हजार चौरस फूटांची रंगरंगोटी केलेली आहे.