पुणे महापालिकेत सरसकट हेल्मटसक्ती, नियमांना बगल दिल्यास कारवाई होणार, आयुक्तांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:46 IST2024-11-30T13:44:58+5:302024-11-30T13:46:11+5:30
पुणे महापालिकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह आता सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जाणार नाही

पुणे महापालिकेत सरसकट हेल्मटसक्ती, नियमांना बगल दिल्यास कारवाई होणार, आयुक्तांच्या सूचना
पिंपरी : शासकीय कार्यालयात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्याची दखल घेत महापालिकेच्या वतीने हेल्मटसक्तीची अंलबजावणी करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह आता सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
अपर पोलिस महासंचालकांनी २५ नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्ती करावी, असा आदेश जारी केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. वाहतूक विभागाने हेल्मेटसक्तीचा काढलेला आदेश औद्योगिकनगरीत कागदावरच असल्याचे दिसत आहे. वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे, तसेच शासकीय कार्यालयांमध्येही हेल्मेटसक्तीचा केवळ सोपस्कार पाळला जातो. शहरातून जाणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर विनाहेल्मेट वाहने दामटली जात आहेत, असे निरीक्षण नोंदविले होते.
महापालिकेतर्फे कडक अंमलबाजवणी
पिंपरी : चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून पालिकेला सूचना केल्या होत्या. महापालिकेच्या वतीने हेल्मेट सक्ती लागू केली आहे. प्रवेशद्वारावर महापालिकेतील कर्मचारी हे हेल्मेटविना असतील, तर प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, आता प्रशासनाने महापालिका भवनात येणाऱ्या सर्वांनाच हेल्मेट सक्ती केली आहे, याबाबतच्या सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरक्षा विभागाला दिल्या आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त उदय जरांडे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून हेल्मेट सक्तीबाबत सूचना आल्या होत्या, तसेच महापालिकेचे आयुक्त यांनीही सूचना केल्या आहेत. महापालिकेत आता हेल्मेटविना दुचाकींना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांना बगल दिल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.’