कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने संगणक अभियंता महिलेचे अपहरण करुन लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 09:46 PM2020-11-11T21:46:56+5:302020-11-11T21:49:21+5:30
ही महिला बंगलुरु येथील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते.
पुणे : कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने एका संगणक अभियंता महिलेचे अपहरण करुन हात पाय बांधून तोंडात कापडी बोळा घालत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी आरोपींनी महिलेकडील सोन्याचे दागिने कटरने कापून घेण्यात आले़ तसेच गुगल पे व एटीएम कार्डमधून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. त्यानंतर महिलेला कारमध्ये शीटला बांधलेल्या अवस्थेतच सोडून आरोपी पळून गेले.
याप्रकरणी साळुंखे विहार येथील एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी राजेशसिंग (रा. बालाजी निवास, सांळुखे विहार) व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला बंगलुरु येथील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते. सुट्टीमध्ये तीन आठवड्यापूर्वी त्या आई वडिलांकडे साळुंखे विहार येथे आल्या. त्यांच्या वडिलांनी गाडी शिकविण्यासाठी त्यांच्या ओळखीच्या राजेश सिंग याला सांगितले. राजेश सिंग हा तिला काही दिवस कार चालविण्यास शिकवत होता. दरम्यान, या महिलेचे आईवडिल कामानिमित्त हैद्राबादला गेले होते.
राजेश सिंग हा एका मित्रासह मंगळवारी साडेआठ वाजता त्यांच्या घरी गेला. कार शिकविण्यासाठी त्यांना बरोबर घेत वाटेत मित्राला सोडवायचे असल्याचे सांगून त्यालाही गाडीत घेतले. त्यांना पिसोळी येथे नेण्यात आले. मात्र गाडी बंद पडू लागल्याने राजेश गाडी चालविण्यास बसला. त्याने पैशाची गरज असल्याचे सांगून त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी घरी गेल्यानंतर पैसे देते, असे सांगितले. त्यावर राजेश सिंग याने पैसे आताच पाहिजे, असे म्हणाला. त्याच्या मित्राने या महिलेचे हात मागच्या बाजूला ओढून कपड्याने बांधून ठेवले. महिलेने आरडाओरडा करुन नये, म्हणून रुमालाचा बोळा त्यांच्या तोंडात कोंबून त्यावर मास्क लावला. आरोपींनी त्यांच्या गुगल पेमधून ४० हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. त्याच्या साथीदाराने महिलेच्या घराची चावी घेऊन दुसऱ्या वाहनाने जावून घरातून तिची पर्स घेऊन आला. तिच्याकडून एटीएमचा पासवर्ड घेऊन १० हजार रुपये स्वत: काढून आणले. आरोपींनी त्यांच्या हातातील तीन अंगठ्या निघत नसल्याने कटर आणून त्या कापून काढून घेतल्या. त्यानंतर त्यांना गाडीत बांधलेल्या स्थितीत ठेवून ते पळून गेले.
त्यानंतर या महिलेने हात सोडवून घेत गाडी घेऊन घरापर्यंत आल्या. आईवडिलांना फोन करुन पोलिसांकडे धाव घेतली. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरु केला आहे.