झोपडपट्टीत संगणक साक्षर मोहीम

By admin | Published: May 27, 2017 01:31 AM2017-05-27T01:31:27+5:302017-05-27T01:31:27+5:30

शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या किमान २ लाख पुणेकरांना येत्या काही महिन्यांमध्ये संगणक साक्षर करण्यात येणार आहे. महापालिकेने केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेतंर्गत हा उपक्रम सुरू केला

Computer literacy campaign in slum | झोपडपट्टीत संगणक साक्षर मोहीम

झोपडपट्टीत संगणक साक्षर मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या किमान २ लाख पुणेकरांना येत्या काही महिन्यांमध्ये संगणक साक्षर करण्यात येणार आहे. महापालिकेने केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेतंर्गत हा उपक्रम सुरू केला असून त्यासाठी पीएमपीएलच्या स्क्रॅप बसचा वापर करण्यात आला आहे.
महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते. महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘एका बसमध्ये साधारण २५ जागा तयार करण्यात आल्या आहेत. सध्या एकूण ५ बस सुरू होत आहेत. अशा एकूण १०० बस सुरू करण्यात येणार आहेत. रोज एक तास या प्रमाणे २० तासांचा एक अभ्यासक्रमच तयार केला आहे. त्यात स्मार्ट फोन कसा वापरावा, यापासून ते संगणकामार्फत एखादे बिल कसे जमा करावे, अशा सर्व आवश्यक गोष्टींचे प्रशिक्षण यात देण्यात येणार आहे.’’
झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी मोहीम असली तरीही कोणीही त्यात सहभागी होऊ शकेल. शिक्षणाची अट नाही. १७ वर्षे वयापासून ते ८७ पेक्षाही जास्त वयाच्या कोणालाही प्रवेश असेल. सीएसआर व पुणे कनेक्ट या कंपनीच्या माध्यमातून २० वेगवेगळ्या कंपन्यांनी या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे महापालिकेला यात काहीही खर्च करावा लागणार नाही. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व झोपडपट्ट्यांमध्ये ही वाहने विशिष्ट वेळी थांबतील. त्याची नावे व तिथे कोणाशी संपर्क साधायचा याचे वेळापत्रक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होईल, असे महापौरांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमात महापालिकेचा पूर्ण सहयोग आहे. त्यासाठीच संगणक साक्षरता मोहीम सुरू करण्यात आली आहे. अगदी सामान्य नागरिकालाही संगणकाची आवश्यक ती सर्व
माहिती व्हावी व त्याने संगणकामार्फतच आपली कामे करावीत, असा उद्देश आहे.
संगणक साक्षरता केंद्राची संख्या लवकरच वाढवण्यात येणार असून शहराच्या सर्व भागांमध्ये अशी केंद्र असतील व त्याचा नागरिकांना फायदा घेता येईल, या प्रकारे या उपक्रमाची अंमलबजावणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: Computer literacy campaign in slum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.