पोलीस हवालदाराने विकसित केल्या संगणकप्रणाली
By admin | Published: May 12, 2015 04:29 AM2015-05-12T04:29:59+5:302015-05-12T04:29:59+5:30
केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या पोलीस हवालदाराने उच्चविद्याविभूषित संगणक अभियंत्यांनाही मागे टाकेल, अशा एक नव्हे तर तब्बल ९
पुणे : केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या पोलीस हवालदाराने उच्चविद्याविभूषित संगणक अभियंत्यांनाही मागे टाकेल, अशा एक नव्हे तर तब्बल ९ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. संगणकाचे तंत्रज्ञान आत्मसात करून या पोलीस कर्मचाऱ्याने शस्त्र परवान्यांपासून ते परकीय नागरिक नोंदणीपर्यंतचे सर्व अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी या प्रणाली विकसित केल्यामुळे पोलीस दलाचे लाखो रुपये वाचले आहेत. संगणक क्षेत्रामध्ये नवीन आणि वेगळे काही तरी करण्याची धडपड करणाऱ्या या पोलिसाचे नाव आहे रवींद्र नानासाहेब इंगवले.
पोलीस आयुक्तालयामध्ये इंगवले यांना त्यांचे मित्र गमतीने ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ म्हणून हाक मारतात. पुण्याजवळच्या नांदेड गावाचे ते मूळचे रहिवासी. विज्ञान शाखेमधून बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नोकरी शोधावी लागली. १९९४मध्ये बिनतारी संदेश विभागात त्यांची नेमणूक झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या इंगवले यांनी १९९९मध्ये सी-डॅक संस्थेमधून संगणक प्रशिक्षण घेतले. दरम्यान, त्यांची बदली पुणे शहर पोलीस दलामध्ये झाली.
तेथे त्यांनी शस्त्र परवान्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी संगणक प्रणाली त्यांनी तयार केली. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यांनी इंगवले यांच्यामधील तंत्रज्ञानाची आवड लक्षात घेतली. पुण्यामध्ये सहआयुक्त म्हणून आलेल्या सिंघल यांनी इंगवले यांना पुणे शहर पोलीस दलामध्ये सामाविष्ट करून घेतले. त्यानंतर इंगवले यांनी वेगवेगळ्या स्वरूपांच्या ९ प्रणाली विकसित केल्या. साधारणपणे १९३२ ते २०१४ या कालावधीमधील शस्त्र परवान्यांच्या माहितीचे डिजिटायझेशन त्यांच्या प्रणालीमुळे करणे सोपे झाले.
पूर्वी हॉटेल परवान्यांच्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या जात होत्या. परवान्यांची मुदत संपली, की पुन्हा जुने बाड शोधण्याचे किचकट काम सोपे करण्यासाठीठीही त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले. यामुळे मुदत संपलेल्या परवान्यांसाठी पोलिसांकडून वेळेत नोटिसा जाऊ लागल्या. यासोबतच पोलिसांच्या घरांबाबतची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली. किती पोलीस वसाहती आहेत, या वसाहतींमधील खोल्यांमध्ये सध्या कोण राहते, यासाठी त्यांनी एक संगणक अॅप्लिकेशन तयार केले.
गणेशोत्सवामध्ये पोलिसांना मदत केलेल्या पाच हजार विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांच्या कामाचे वाटप याकरिता इंगवले यांनी दोन दिवसांत प्रणाली तयार केली. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पीपीएफ पावत्या देण्यासाठी संगणकप्रणाली तयार केली. मंत्रालयाशी होणाऱ्या पत्रव्यवहार तसेच प्रस्तावांची सविस्तर माहिती ठेवणारी एक यंत्रणा त्यांनी तयार केली. यासोबतच मुंबईच्या राज्य राखीव पोलीस दलाकरिता पोलीस कर्मचारी व्यवस्थापन संगणकप्रणाली, बिनतारी विभागासाठी बिनतारी पोलीस भरती प्रक्रिया, पोलीस शिपाई अंतिम परीक्षा प्रक्रिया प्रणाली, तांत्रिक सुटेभाग व्यवस्थापन प्रणाली, चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती प्रणालीही त्यांनी विकसित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस मॅन्युएलच्या मराठीकरणाचे संगणकीकरण करण्यासाठीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. (प्रतिनिधी)